खरीप हंगाम काढणीवर पावसाचे सावट; मजुरांची टंचाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Cotton

खरीप हंगाम काढणीवर पावसाचे सावट; मजुरांची टंचाई

नांदुरा (जि. बुलडाणा) - खरीप हंगामाच्या ऐन काढणीच्या पूर्वार्धातच धुवाधार पाऊस सुरू असल्याने वेचणीस आलेल्या कापूस पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. अगोदरच सततच्या पावसामुळे उभ्या कपाशीवर लाल्या व करप्याचे आक्रमण झाल्याने अपरिपक्व बोंड फुटायलाही सुरुवात झाली. सगळीकडे एकाच वेळी कापूस वेचणीस सुरुवात झाल्‍याने मजुरांची टंचाई भासत असून, मजूरी देखील वाढली आहे. आज घडीला नांदुरा तालुक्यातील अनेक गावांत कापूस वेचणीचे दर वधारले आहेत.

नांदुरा तालुका हा कॉटनबेल्ट असून, परिसरातील मलकापूर, मोताळा व खामगाव तालुक्यातही कापसाचा पेरा हा मोठ्या प्रमाणात होतो. गेल्या दोन वर्षात निसर्गाची वक्र दृष्टी झाल्याने शेतकऱ्यांच्या हाती धुपाटनेच आले आहे. सध्या खरीप हंगामातील पीके काढणीवर असून, याचवेळी पावसाच्या एंट्रीने बळीराजाला हवालदिल करून सोडले आहे.

हेही वाचा: अकोला : उमेदवारीविरोधात न्यायालयात जाण्याची शेवटची संधी उद्या

गणपती आगमनाच्या अगोदर नांदुरा तालुक्यातील संपूर्ण परिसरात वादळी वाऱ्यासह ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने अनेकांची खरिपाची सर्व पिके कोलमडून गेली आहेत. सोबतच याच जास्तीच्या पावसामुळे कपाशीवर लाल्या व करप्याचे संकट कोसळल्‍याने हाती आलेला हंगाम संपुष्टात आल्यात जमा आहे. अनेक शेतकऱ्यांच्या कपाशीला पान ही शिल्लक नसून उभी कपाशी वाळून गेल्यामुळे उत्पन्नात कमालीची घट येणार असल्याने शासनाने त्वरित झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

खर्च अडमाप मात्र कापसाचे दर स्थिरच

कापसाचा खर्च पाहता सातशे ते आठशे प्रमाणे एकरी दोन बॅग बिटी बियाणे, तीन वेळेस रासायनिक खतांचा डोस, फवारणीचा वेगळा खर्च सोबतच शेती मशागत ते निंदन, खुरपणी, डवरणी पर्यंतचा खर्च व मजुरीचे दर आणि दुसरीकडे शासनाने हमीभावात अपेक्षित वाढ न करण्याचे तंत्र वापरल्याने व खरेदीलाही वेळेवर मुहूर्त साधत नसल्याने खासगी व्यापारी शेतकऱ्यांची पिळवणूक करणार हे निश्चित असून आज रोजी कापसाला केवळ ५ हजार ते साडेपाच हजार रुपये क्विंटलचा भाव असल्याची माहिती आहे.

सोयाबीनची चिंता

सोयाबीन उत्‍पादक शेतकऱ्यांना गत दोन वर्षाचा वाईट अनुभव असून, पुर्ण हंगाम व्‍यवस्‍थित पार पडतो. परंतु, ऐन पीक घरात येण्याच्‍या वेळी पावसाने केलेली फटकेबाजी शेतकऱ्यांच्या स्‍वप्‍नांची राखरांगोळी करुन जाते. त्‍यामुळे यावर्षी तरी या दृष्ट चक्रातून सुटका होईला का ? अशी चिंता शेतकऱ्यांना भेडसावत आहे.

Web Title: Buldhana Kharip Season Rain Loss Labour Shortage

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Buldhanarain
go to top