रोजगाराच्या नावाखाली महिलांची फसवणूक; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

एजन्सीच्या दोन संचालकांसह अकोल्यातील एजन्ट तक्रारकर्त्या महिलेचाही समावेश
Job fraud
Job fraudesakal

अकोला : फॅन्सी बटन बनवण्याची मशीन आणि कच्चा माल पुरवून रोजगार उपलब्ध करून देण्याच्या नावाखाली दीड हजार निराधार महिलांची एक कोटी ३२ लाख रुपयांनी फसवणूक करणाऱ्या तिघांविरुद्ध खदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आर्थिक गुन्हे शाखेने केलेल्या तपासानंतर या प्रकरणातील तक्रारकर्त्या महिलेसह एजन्सीच्या दोन संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल करून शुक्रवारीच तकारकर्त्या महिलेला अटक करण्यात आली.

पुणे येथील राधाकृष्ण सेल्स कार्पाेरेशन महिला स्वयंरोजगार कंपनीचा संचालक आणि सातारा येथील राधाकृष्ण सेल्स कार्पोरेशनचा मॅनेजिंग डायरेक्टर अजित हिरवेने अकोला जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलच्या जिल्हा महासचिव संगीता चव्हाण यांच्या माध्यमातून महिलांची साखळी करीत त्यांना रोजगार देण्याचे आमिष दाखविले. यंत्र व कच्चा माल पुरविण्याच्या नावाखाली कोट्यवधी रुपये लाटले. या संदर्भात अकोल्यातील एजन्ट संगीता चव्हाण यांनी दीड हजार महिलांची साखळी तयार केली. नंतर पुणे व साताऱ्याच्या कंपनी संचालक व व्यवस्थापकांनी हात वर केल्याचे लक्षात येताच कारवाई टाळण्याच्या उद्देशाने संगीता चव्हाण यांनी पोलिस अधीक्षकांकडे धाव घेत तक्रार दाखल केली.

पोलिस अधीक्षकांनी गुन्ह्याचे गांभिर्य लक्षात घेवून आर्थिक गुन्हेशाखेकडे या प्रकरणाचा तपास दिल्यानंतर यातील सत्य उघड झाले. अकोला जिल्ह्यात १२०० महिलांची साखळी तयार करून त्यांच्याकडून पैसे उकडणाऱ्या तिघांविरुद्धही आर्थिक गुन्हे शाखेने केल्या तपासणानुसार खदान पोलिस स्टेशनमध्ये भादंवी कलम ४२०, ४०६ व ३४ नुसार आर्थिक गुन्ह्यांशी संबंधित अधिनयमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. ज्या महिलेने पोलिस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केली होती, तिच्याविरुद्धही गुन्हा दाखल झाल्याने तिला शुक्रवारीच पोलिसांनी अटक केली.

अशी केली फसवणूक

महिलांकडून पैसे उकडणाऱ्यांनी सुरुवातीला एका बटनमागे ४० पैसे तर एका महिलेने तीन महिला जोडल्यास एका बटनमागे दोन रुपये मिळतील असे आमिष देण्यात आले होते. त्यानुसार १२०० महिला जोडल्या गेल्या. सुरुवातीला १० ते १२ हजार रुपये महिना मिळत होता. नंतर कच्चा माल पाठवणे बंद झाले. केलेल्या कामाचे पैसेही मिळले नाही. या १२०० महिलांचे एक कोटी ३२ लाख रुपये कंपनीचे अजित हिरवे यांना पाठवण्यात आले होते.

एक उद्योग बंद करून दुसऱ्यातही फसवणूक!

फॅन्सी बटनाचा उद्योग बंद केल्यानंतर कंपनीच्या दोन्ही संचालकांनी मसाला उद्योग सुरू केला. त्यासाठी पुन्हा संगीता चव्हाण यांना महिलांची साखळी तयार करण्यास सांगितले. त्यानुसार मसाला उद्योगासाठीही ३०० महिलांची साखळी तयार झाली. या ३०० महिलांकडून प्रत्येकी १५ हजार रुपये उकडण्यात आले. सुरुवातीला काही दिवस कच्चा माल पाठवला नंतर तोही बंद करण्यात आल्याने महिलांची फसवणूक झाल्याचे लक्षात आले.

तक्रारकर्ते होऊन वाचण्याचा प्रयत्न

अकोला जिल्ह्यातील १५०० महिलांची फसवणूक करणाऱ्या कंपनीच्या संचालकांना मदत करणारी अकोल्यातील एजन्ट संगीता चव्हाण यांनी पोलिस अधीक्षकांकडे स्वतः तक्रार दाखल केली होती. महिलांच्या फसवणुकीत आपणही दोषी ठरविल्या जाण्याची भिती असल्यान त्यांनी तक्रारकर्ते होऊन वाचण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांच्या तपासानंतर तक्रारकर्त्यावरही गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. त्यामुळे स्वतःला वाचविण्याचा संगीता चव्हाण यांचा प्रयत्न फसला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com