नागरिकांनो सावधान! सायबर गुन्हेगारांनी काढले डोकेवर; शोधली एक नवीन युक्ती

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 20 June 2020

सायबर भामटे तुमच्या सोशल मीडियावरील विशेषतः फेसबुकवर पाळत ठेवतात. सध्या नागरिकांचा बराच वेळ हा इंटरनेट सर्फिंग आणि प्रामुख्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जातो.

अकोला : सध्या नागरिकांचा बराच वेळ हा इंटरनेट सर्फिंग आणि प्रामुख्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जातो. त्यात फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, लिंक्डइन, टिकटॉक इत्यादींचा समावेश आहे. सायबर भामट्यांनी सध्या याच गोष्टीचा फायदा घेत सर्वसामान्य नागरिकांना ऑनलाइन आर्थिक फसवणुकीसाठी एक नवीन युक्ती शोधली आहे. नागरिकांनी ऑनलाइन आर्थिक फसवणुकीपासून सावध रहावे, असे आवाहन ‘महाराष्ट्र सायबर’मार्फत करण्यात येत आहे.

सायबर भामटे तुमच्या सोशल मीडियावरील विशेषतः फेसबुकवर पाळत ठेवतात. मग तुमच्या एखाद्या परिचित व्यक्तीच्या सोशल मीडियावरील उपलब्ध फोटोज व अन्य माहितीच्या आधारे त्याचे फेक प्रोफाईल बनवितात व तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवितात. त्याबरोबर एक मेसेज पण येतो की, माझा आधीचा अकाउंट हॅक झाल्यामुळे हा नवीन अकाउंट आहे. सर्वसामान्य नागरिक यावर विश्वास ठेवून ती फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारतात.

महत्त्वाची बातमी - ‘तू मला आवडतेस’ असे म्हणत शेतमालकानेच केला कामावर असणाऱ्या महिलेचा...

मग या अकाउंटवरून कधी तुम्हाला तुमच्या मोबाइल किंवा लॅपटॉपवर एखादे चुकीचे ऍप डाउनलोड करायला सांगितले जाते व आपण तसे केल्यास मोबाइल किंवा लॅपटॉपचा कंट्रोल या सायबर भामट्यांकडे जातो. ते त्याद्वारे तुमचा सर्व डेटा घेऊ शकतात किंवा बँक खात्यातील पैसे दुसरीकडे वळवू शकतात.

सावध राहा
सायबर विभागाने सर्व नागिरकांना आवाहन केले आहे की, सोशल मीडिया विशेषतः फेसबुक वापरताना सावध राहा. कोणत्याही अनोळखी व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारु नका. तसेच आपल्या सर्व फोटोज व फोटो अल्बमची प्रायव्हसी सेटिंग अपडेट करा. त्यामुळे कोणीही तुमचे फोटो डाऊनलोड करू शकणार नाहीत. तसेच आपल्या फेसबुक फ्रेंडकडून एक प्रोफाईल असताना दुसऱ्या प्रोफाईलवरून फ्रेंड रिक्वेस्ट आली तर ती स्वीकारण्याआधी त्या व्यक्तीशी प्रत्यक्ष किंवा अन्य मार्गाने संभाषण करा. ती रिक्वेस्ट त्या व्यक्तीनेच पाठविली आहे याची खात्री करा व मगच स्वीकारा. अन्यथा ते प्रोफाईल ब्लॉक करा. फक्त सोशल मीडियावर नाही तर आपल्या परिचित किंवा मित्र यादीतील व्यक्तींबरोबर ई-मेल, व्हाट्सऍपद्वारे किंवा फोन करून पण संपर्कात राहा.

येथे करा तक्रार
तुम्ही जर एखाद्या अशा प्रकारच्या गुन्ह्यात फसविले गेले असाल तर कृपया त्याची तक्रार जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये करा व http://www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर देखील त्याची नोंद करा, असे आवाहन ‘महाराष्ट्र सायबर’मार्फत करण्यात येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Citizens should beware of online financial fraud in akola district