esakal | अकोल्यात फुलणार शंभर एकरावर रंगीत कापूस
sakal

बोलून बातमी शोधा

4Cotton_20.jpg

संशोधनात्मक कार्य करणाऱ्या संस्थांनी एकत्र येऊन विकासात्मक कार्य करावे, या तत्त्वाने नैसर्गिकरित्या रंगीत कापड निर्मिती व विक्रीसाठी तिहेरी स्वरूपाचा सामंजस्य करार जुलै 2019 मध्ये मुंबई येथील केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेत झाला होता. या करारानुसार गेल्यावर्षी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने या खाकी व सेंद्रिय कापूस वाणाची वणी रंभापूर येथील प्रक्षेत्रावर 25 एकरावर पेरणी केली होती. त्यातून 50 क्विंटल रंगीत कापूस उत्पादन विद्यापीठाने घेतले आहे. त्यामधील रुई व सरकी वेगळी करून सहा क्विंटल बियाणेसुद्धा तयार केले आणि आता त्याची याच प्रक्षेत्रावर 100 एकरांवर पेरणी केली आहे.

अकोल्यात फुलणार शंभर एकरावर रंगीत कापूस

sakal_logo
By
अनुप ताले

अकोला ः रंगीत कापूस उत्पादनाचे स्वप्न कृषी शास्त्रज्ञांनी प्रत्यक्षात उतरविले असून, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या वणी रंभापूर अकोला प्रक्षेत्रावर 50 क्विंटल उत्पादन घेऊन खाकी कापूस उत्पादनाचा पहिलाच प्रयोगसुद्धा यशस्वी केला आहे. यंदा विद्यापीठाने एक पाऊल पुढे टाकत याच कापसाच्या सरकीपासून बियाणे तयार करून 100 एकरांवर पेरणी केली आहे.

संशोधनात्मक कार्य करणाऱ्या संस्थांनी एकत्र येऊन विकासात्मक कार्य करावे, या तत्त्वाने नैसर्गिकरित्या रंगीत कापड निर्मिती व विक्रीसाठी तिहेरी स्वरूपाचा सामंजस्य करार जुलै 2019 मध्ये मुंबई येथील केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेत झाला होता. त्यानुसार रंगीत कापूस बियाणे उपलब्ध करून देण्याची जबाबदारी केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर यांनी स्वीकारली असून, पूर्णपणे सुरक्षित ठिकाणी मोठ्या प्रमाणात रंगीत कापूस उत्पादित करण्याची जबाबदारी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी घेतली आहे तर, या रंगीत कापसापासून कापड निर्माण करून त्याची विक्री करण्याची जबाबदारी केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्था मुंबई यांनी उचलली आहे. या करारानुसार गेल्यावर्षी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने या खाकी व सेंद्रिय कापूस वाणाची वणी रंभापूर येथील प्रक्षेत्रावर 25 एकरावर पेरणी केली होती. त्यातून 50 क्विंटल रंगीत कापूस उत्पादन विद्यापीठाने घेतले आहे. त्यामधील रुई व सरकी वेगळी करून सहा क्विंटल बियाणेसुद्धा तयार केले आणि आता त्याची याच प्रक्षेत्रावर 100 एकरांवर पेरणी केली आहे.

गेल्यावर्षीच्या उत्पादनातून बियाणे निर्मिती
डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर व केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्था मुंबई यांच्या संयुक्तपणे करारानुसार हा उपक्रम राबविण्यात येत आहे. उपक्रमांतर्गत गेल्यावर्षी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर जवळपास 25 एकरांवर या कापूस वाणाची पेरणी केली. त्यातून जवळपास 50 क्विंटल उत्पादन निघाले. निघणाऱ्या सरकीचे बियाणे करून या वर्षी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावरच 100 एकरांवर या सेंद्रिय व रंगीत कापूस वाणाची पेरणी करण्यात आली आहे.
- डॉ.विलास खर्चे, संचालक संशोधन, डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला

नैसर्गिकरित्या रंगीत कापड निर्मिती केली जाईल 
या उपक्रमांतर्गत डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या 25 एकर प्रक्षेत्रावर "वैदेही 95' या नागपूरच्या केंद्रीय कापूस संशोधन संस्थेच्या तपकिरी रंगाच्या कापूस वाणाची गेल्यावर्षी पेरणी केली होती. उत्पादित कापसातून जवळपास 25 क्विंटल रुई निघाली असून, ती आयसीआर सीडकॉट, मुंबई यांना पुरविण्यात येणार आहे. तेथे यावर प्रक्रिया करून नैसर्गिकरित्या रंगीत कापड निर्मिती केली जाईल आणि ते बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. शिवाय निघालेल्या सरकीपैकी दर्जा असलेल्या बियाण्याची विद्यापीठाच्या प्रक्षेत्राच्या 100 एकरांवर यंदा पेरणी केली आहे.
- डॉ. डी. टी. देशमुख, वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ कापूस, डॉ. पंदेकृवि अकोला

संपादन ः अनुप ताले

loading image