
अकोला : महानगरपालिकेच्या कामकाजाला गती देण्याच्या उद्देशाने आयुक्त कविता द्विवेदी यांनी अनेक उपक्रम राबविले आहेत. त्यानंतरही आयुक्त मॅडमच्या स्वाक्षरीनंतर दहा-दहा दिवस संबंधित विभागातून पुढे हलत नाही. हा प्रकार थांबविण्यासाठी शुक्रवारी मनपाच्या सर्व विभाग प्रमुखांना एक मेसेज पाठविण्यात आला. हा मेसेज सर्व विभागाच्या व्हॉटस्ॲपच्या मेसेस बॉक्समध्ये खणखणला आणि पावणे दहाच्या ठोक्याला सर्व कर्मचारी त्यांच्या जागेवर हजर झाले.
आयुक्तांच्या धास्तीमुळे ता. २ सप्टेंबर रोजी महापालिका कार्यालय पावणे दहा वाजता कर्मचाऱ्यांनी फुलून गेले होते. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटले. येणारा प्रत्येक कर्मचारी आधी आलेल्या सहकाऱ्याला मॅडम आल्यात का म्हणून विचारत होता. हा प्रकार काय? कशामुळे ही लगबग सुरू होती, याविषय प्रत्येक जण जाणून घेण्यास उत्सुक होता. शिस्तप्रिय आयुक्त कविता द्विवेदी यांच्या कात्रीत सापडू नये म्हणून सर्वच विभाग प्रमुख व त्यांच्या अधिनस्त कार्यालयातील सहकारी अगदी पावणे दहाच्या ठोक्याला कार्यालयात हजर झाले.
आयुक्त सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता महापालिकेच्या विविध विभागात स्वत: जावून पेडिंग फाईल्सची तपासणी करणार आहेत, असा मेसेज विभाग प्रमुखांना मिळाला होता. त्यामुळे ते सतर्क झालेत, त्यांनी विभागातील सहकाऱ्यांनाही याबाबत माहिती दिली. आयुक्त फाईल्स तपासणार असल्या तरी त्या दररोज पावणे दहा ते दहाच्या दरम्यान महापालिकेत येतात. त्यामुळे आयुक्तांनी कार्यालयात पोचण्याआधी महापालिकेत पोचण्यासाठी कर्मचाऱ्यांमध्ये जणू स्पर्धा लागली होती. मात्र, सर्वच कर्मचारी सूचनेमुळे कार्यालयात हजर झाल्याने आयुक्तांनीही पेडिंग फाईल्सची तपासणी न करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे विविध विभागातील कर्मचाऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला.
आयुक्तांच्या स्वाक्षरीनंतरही फाईब पेंडिंग कशासाठी?
मनपा आयुक्त कविता द्विवेदी यांनी कारभार सुधारण्याच्या दृष्टीने अनेक नियम मनपा कर्चमारी, अधिकाऱ्यांना घालून दिले आहेत. त्यानंतरही काही कामचुकार कर्मचारी हे वेळेवर हजर होत नाही. सोयीनुसार कार्यालयात येतात. कार्यालयात आले तर ११-१२ वाजताशिवाय कामाला सुरुवात करीत नाही. त्यामुळे कामाची गती मंदावली आहे. त्यावर कहर म्हणजे आयुक्तांनी स्वाक्षरी करून फाईल मंजूर केल्यानंतरही विभागात संबंधित कर्मचाऱ्यांच्या टेबलवर ती दहा-बारा दिवस पडून असते. याबाबत विचारणा केल्यानंतरही फाईल जागेवरून हलते. त्यामुळे नागरिकांना होणार त्रास लक्षात घेवून आयुक्तांनी फाईल तपासणीचा निर्णय घेतला होता. तसा मेसेजही पाठविला. त्यामुळे आठवड्याच्या शेवटच्या दिवशी कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ झाली.