शुकशुकाट...रस्ते निर्मनुष्य, नागरिकांनी पाळली शिस्त

सुगत खाडे  
Saturday, 18 July 2020

कोरोना विषाणूच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात तीन दिवसांची टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. टाळेबंदीच्या पहिल्या दिवशी (ता. 18) शनिवारी रस्त्यांवर शुकशुकाट दिसून आला. 

अकोला  ः कोरोना विषाणूच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात तीन दिवसांची टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. टाळेबंदीच्या पहिल्या दिवशी (ता. 18) शनिवारी रस्त्यांवर शुकशुकाट दिसून आला. कोणतीही

शिस्त न पाळण्याची ख्याती असलेल्या अकोलेकरांनी स्वतःच्या व इतरांच्याही सुरक्षेची काळजी घेत खरोखरच लॉकडाउनच्या नियमांचे पुन्हा एकदा तंतोतंत पालन केले. त्यामुळे आरोग्य सेवा वगळता शहरात मुख्य बाजारपेठेसह सर्वत्र कडकडीत बंद पाहायला मिळाला. अत्यावश्‍यक आहे तेवढेच नागरिक घराबाहेर पडले, तेही संपूर्ण सुरक्षा नियम पाळून.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

कोरोना विषाणू विरोधात लढाईला अधिक तीव्र करण्यासाठी जिल्ह्यात 18, 19 व 20 जुलैरोजी तीन दिवसांचा संपूर्ण लॉकडाउन (टाळेबंदी) जाहीर करण्यात आला आहे. यापूर्वी सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशाने संपूर्ण देशात 24 मार्चपासून टाळेबंदी लागू करण्यात आली होती. परंतु त्यानंतर मिशन बिगीन अगेन सुरु करुन अर्थचक्राला गती देण्यात आली. दरम्यान सध्या कोरोनाचा कहर वाढत असल्याने जिल्ह्यात पालकमंत्री बच्चू कडू यांच्या निर्देशाने जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी तीन दिवसांचा लॉकडाउन जाहीर केला आहे. दरम्यान नियम तोडण्यासाठीच असतात अशी ख्याती असलेल्या अकोलेकरांनी शनिवारी (ता. 18) दिवसभर शिस्त पाळली. कोरोना विषाणूशी मुकाबला करण्यासाठी अकोलेकर नागरिकांनी पुन्हा एकदा दाखवलेली एकजुटाता ऐतिसाहिकच असल्याचे दिसून आले. शनिवारी सकाळपासूनच रस्त्यावर शुकशुकाट होता. कुणीही घराबाहेर पडले नाही. फक्त अत्यावश्‍यक सेवा सुरळीत होत्या. दवाखाने, औषध विक्रीची दुकाने, दुध डेअरीची दुकाने उघडी होती. हॉटेल, कपडा, किराणा व इतर व्यावसायिकांनीही लॉकडाउनमध्ये सहभागी पहिल्या दिवशी कडकोड बंद पाळला.

बाजार सामसूम; रस्त्यांवर पोलिसच
लॉकडाउनच्या पहिल्या दिवशी शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या गांधी रोड, तिलक रोड, कश्‍मीर लॉज रोड, जयहिंद चौक, रणपिसे नगर चौक, जठारपेठ चौक, गौरक्षण व सिंधी कॅम्प रोड, कौलखेड भागात अभूतपूर्व बंद पाडण्यात आला. रस्त्यांवर केवळ पोलिसच दिसून आले.

मेडिकल वगळता इतर दुकाने बंद
टाळेबंदीच्या पहिल्या दिवशी मेडिकल, वैद्यकीय सेवा देणारे प्रतिष्ठान वगळता शहरातील सर्वच दुकाने बंद दिसून आली. विषाणू विरुद्धच्या लढ्यात सर्वच व्यावसायिकांनी कडेकोट बंद पाडून कोरोनाच्या लढ्यात आम्ही प्रशासनासोबत असल्याचे दाखवून दिले.

पुढील दोन दिवस टाळेबंदी कायम!
कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक उपायांचा भाग म्हणून जिल्ह्यातील सर्व प्रकारची दुकाने, व्यापारी प्रतिष्ठाने, लहान-मोठे व्यवसाय शनिवार (ता. 18) ते सोमवार (ता. 20) पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत. त्यामुळे रविवारी व सोमवारी सुद्धा जिल्ह्यात लॉकडाउन कायम राहिल. सदर आदेशातून वैद्यकीय सेवांसह मेडिकल दुकानांना मात्र वगण्यात आले आहे.
 

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona lockdown akolaroads are deserted, citizens follow discipline