
बोराखेडी ठाणेदार व पोलिस कर्मचाऱ्यात जुंपली; जुगार प्रकरणात ६० हजार घेतल्याचा आरोप
मोताळा : जुगारावरील छापा प्रकरणात ६० हजार रुपये घेतल्याच्या आरोपावरून बोराखेडी येथील एएसआय राजेश आगाशे व ठाणेदार राजेंद्र पाटील यांच्यात चांगलीच जुंपली आहे. याबाबत श्री आगाशे यांनी सोशल मीडियावर कारवाईचा व्हिडीओ व इतर मजकूर पोस्ट करून खळबळ उडवून दिली. तर, ठाणेदार श्री. पाटील यांनी सदर प्रकरणात चौकशी सुरू असून, चौकशीअंती सत्य काय ते समोर येईल असे दै. सकाळशी बोलताना सांगितले आहे.
येथील बोराखेडी पोलिस ठाण्यात कार्यरत एएसआय राजेश आगाशे, नापोकाँ श्री. गोरे, पोकाँ श्री. शिंदे, पोकाँ श्री. धामोडे यांनी शुक्रवारी (ता. १०) येथील लोखंडे कॉम्प्लेक्सच्या पाठीमागे सुरू असलेल्या जुगारावर छापा मारून शेख इम्रान शेख बदरुद्दीन (२५, रा. मोताळा), जगदेव शंकर धुरंधर (६५, रा. टाकळी), प्रकाश लक्ष्मण धुरंधर (६०, रा. बोराखेडी) व गजानन प्रल्हाद अढाव (५५, रा. मोताळा) या चौघांना पकडले होते. त्यांच्या ताब्यातून ८० हजार रुपये किंमतीच्या दोन दुचाकी, रोख ३०६० रुपये आणि २० रुपयांचा ताशपत्ता असा एकूण ८३ हजार ८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल केला होता.
दरम्यान, तुम्ही जुगार प्रकरणात ६० हजार रुपये घेतले असून, एसपी साहेबांनी तुमची चौकशी करायची सांगितली आहे, असे ठाणेदार राजेंद्र पाटील यांनी म्हटल्याचे राजेश आगाशे यांनी रविवारी (ता.१२) सायंकाळी एका व्हाट्सअॅप ग्रुपवर पोस्ट करून खळबळ उडवून दिली. सोबतच जुगारावरील कारवाईचा व्हिडीओ आणि दोन आरोपींच्या जबाबाचे पत्र पोस्ट केले. तसेच मी जर पैसे घेतल्याचे खरे असेल तर सिद्ध करून दाखवा, असा चॅलेंज करणारा मजकूर पोस्ट केला. ठाणेदार व पोलिस कर्मचाऱ्यामधील हा वाद सोशल मीडियावर धडकताच बोराखेडी पोलिस वर्तुळात एकच खळबळ उडाली. दरम्यान, ठाणेदार श्री. पाटील यांनी आरोपींचा जबाब नोंद केला असून, एएसआय राजेश आगाशे यांनीसुद्धा आरोपींचा जबाब घेतला आहे. श्री आगाशे यांच्याकडे दिलेल्या जबाबात एका आरोपीने नमूद केले की, ठाणेदार पाटील यांनी मला जुगार प्रकरणात जप्त केलेल्या पैशांबद्दल सखोल विचारपूस केली.
त्यावेळी संबंधीत व्यक्तीने त्याच्याकडून १५०० रुपये जप्त केल्याचे सांगितले. यावर ठाणेदार राजेंद्र पाटील म्हणाले की, तुमच्याकडे नगदी २० हजार रुपये होते, असे सांगा. मी तुमची जुगारात पकडलेली दुचाकी सोडून देतो, असे सांगितले. तेव्हा संबंधिताने माझ्याकडे पंधराशे रुपयेच होते. मी खोटं बोलत नाही. कोणाला फसवत नाही, असे म्हटल्याचा जबाब श्री आगाशे यांच्याकडे दिला आहे. तर, दुसऱ्या आरोपीला बोराखेडी येथील एका व्यक्तीने सांगितले की, तू ठाणेदार पाटील यांना सांग की, श्री आगाशे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तुझ्याकडून ४० हजार रुपये घेतले. आपल्याला बिट जमादार आगाशे यांचा गेम करायचा आहे. त्यांची बिट काढायची आहे. यावर संबंधिताने सांगितले की, माझ्याकडून १२०० रुपयेच जप्त करण्यात आले, असे जबाबात नमूद आहे. एकंदरीत जुगारावरील छाप्यात ६० हजार रुपये घेतल्याचा मुद्दा चांगलाच तापला असून, यामुळे नागरिकांमध्ये पोलिस प्रशासनाची प्रतिमा मलिन होत आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य समोर आणण्याची गरज आहे, अशी मागणी जनमाणसातून केली जात आहे.
एसपी साहेब,,,, इकडे लक्ष द्या
बोराखेडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोरीच्या घटना वाढल्या असून, अवैध धंद्यांना उत आला आहे. त्यात जुगार प्रकरणात ६० हजार घेतल्याच्या मुद्द्यावरून ठाणेदार व पोलिस कर्मचाऱ्यात जुंपली आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाची लक्तरे वेशीवर टांगल्या गेली आहे. कर्तव्यदक्ष जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य समोर आणावे आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सुज्ञ नागरिकांमधून होत आहे.
बिट अंमलदार राजेश आगाशे यांनी जुगार छाप्यातील कारवाईचा व्हिडीओ, आरोपींचा जबाब आणि इतर मजकूर व्हाट्सअॅप ग्रुपवर पोस्ट करणे चुकीचे असून, त्यामुळे गोपनीयतेचा भंग झाला आहे. सदर प्रकरणाची चौकशी सुरू असून, चौकशीअंती सत्य काय आहे, हे समोर येईल.
- राजेंद्र पाटील, ठाणेदार, पो.स्टे. बोराखेडी
जुगार छापा प्रकरणात मी ६० हजार रुपये घेतल्याचा आरोप खोटा आहे. ठाणेदार राजेंद्र पाटील यांनी मला अपमानास्पद वागणूक देऊन त्यांच्या दालनातून बाहेर काढून दिले. या प्रकरणात मला नाहक गोवण्याचा प्रयत्न सुरू आहे. मी जर पैसे घेतले असेल तर सिद्ध करून दाखवा.
- एएसआय राजेश आगाशे, पो.स्टे. बोराखेडी
Web Title: Crime News Accusation In Police Officials Taken Rs 60000 In Gambling Case Akola
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..