
बापाने आपल्या एक वर्षाच्या मुलीला जिवंत पुरले
रिसोड : निर्दयी बापाने आपल्या एक वर्षाच्या मुलीला जिवंत खड्ड्यात पुरले. ही घटना शुक्रवारी (ता. ११) संध्याकाळी साडेसातच्या दरम्यान वाडीवाकद येथे उघडकीस आली. यात चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. सुरेश प्रभाकर घुगे (वय २७) असे आरोपी पित्याचे नाव असून, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिसोड तालुक्यातील वाडीवाकद येथील सुरेश घुगे याचे शेतात घर आहे. सुरेश हा पत्नी कावेरी आणि तीन मुलींसह राहतो. सुरेश आणि त्याच्या पत्नीमध्ये नेहमी भांडण व्हायचे. त्यातच सुरेशला दारूचे व्यसन जडले. घटनेच्या दिवशी दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. सुरेशने पत्नी कावेरीला बेदम मारहाण केली. कावेरीने आपला जीव वाचविण्यासाठी गावाकडे धावत गेली. तिने दिराला हकिकत सांगितली. भावकीतली काही माणसे शेताकडे गेली असता त्यांना लहान मुलगी दिसली नाही. त्यांनी याबाबत सुरेशला विचारणा केली.
यावर सुरेशने स्वतः मुलीला जिवंत खड्ड्यात पुरल्याचे सांगितले. लगेच मुलीला खड्ड्यातून बाहेर काढण्यात आले; मात्र ती गतप्राण झाली होती. रिसोड पोलिसांना माहिती देण्यात आली. ठाणेदार देवेंद्रसिंह ठाकूर यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा केला. आरोपी पिता सुरेश यास अटक केली. सुरेश घुगे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title: Crime Ruthless Father Buried His 1 Year Old Living Daughter In Pit Risod
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..