
अवघ्या ८० हजारात विकला पोटचा गोळा! चार आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
अकोला : अवघ्या ८० हजार रुपयात पोटचा गोळा विक्री करणाऱ्या मातेसह चौघांविरुद्ध खदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शहरातील कैलास टेकडी परिसरातील एका अल्पवयीन मुलीला मध्यप्रदेशात लग्नासाठी विकल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल करून चार आरोपींना पोलिसांनी अटक केली. पीडित अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात आली. कैलास टेकडी परिसरातील एक १३ वर्षांची अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार मुलीच्या आईने खदान पोलिस स्टेशनला दिली होती. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी मुलीचा शोध घेतला.
तपास पथके गठित केली. तांत्रिक सहकार्य व सूत्रांच्या माहितीनुसार मुलीची माहिती घेतली. राजस्थान-मध्यप्रदेश सीमेजवळ मुली असल्याची माहिती त्यातून पुढे आली. पोलिस पथकाने घटना स्थळ गाठून अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले. त्यानंतर तक्रारकर्त्या जन्मदात्या आईनेच मुलीला लग्नासाठी ८० हजार रुपयात विकल्याचे पोलिस तपासातून समोर आले. मुलीच्या आईनेच अल्पवयीन मुलीला आरोपी कैलास रामचंद्र घोपे (२८, रा. मांजरी ता. बाळापूर) याच्या ताब्यात दिले होते.
त्यानंतर देवीबाई कैलास सावळे (रा. अकोट फैल) हिच्या मदतीने मुलीला मध्यप्रदेशात पोहोचविण्यात आले. तेथे मानसिंह अर्जुनसिंह चव्हाण (४०, रा. जलारा मध्यप्रदेश) याच्याकडून लग्नासाठी ८० हजार रुपये घेवून मुलीला त्याच्या ताब्यात देण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी मुलीला ताब्यात घेत जन्मदात्री आईसह चौघांविरुद्ध भादंवि कलम ३६३, ३६६, ३७७, ३४ नुसार गुन्हे दाखल केले. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधीक्षक मोनिका राऊत, पोलिस निरीक्षक श्रीरंग सणस यांच्या मार्गदर्शनात एपीआय गोपाल ढोले, डीबी पथकाचे डिगांबर अरखराव, विजय चव्हाण, रवी डाबेराव, रोहित पवार आदींनी केली.
Web Title: Crime Update Akola Filed Crime Against Four Sell Daughter In Eighty Thousand
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..