पावसामुळे 908 हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान; शेतकरी हवालदिल 

सुगत खाडे
Friday, 17 July 2020

बाळापूर तालुक्‍यातील उरळ व बाळापूर महसूल मंडळात जोरदार पाऊस झाल्याने या मंडळातील 12 गावांतील 908 हेक्‍टर वर पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर पुन्हा संकट निर्माण झाले आहे. परिणामी नुकसान ग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणी करण्यात येत आहे. 

अकोला  ः बाळापूर तालुक्‍यातील उरळ व बाळापूर महसूल मंडळात जोरदार पाऊस झाल्याने या मंडळातील 12 गावांतील 908 हेक्‍टर वर पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर पुन्हा संकट निर्माण झाले आहे. परिणामी नुकसान ग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणी करण्यात येत आहे. 

जिल्ह्यात काही दिवसांपासून पावसाने पाठ फिरवली होती. त्यामुळे शेकडो हेक्‍टर क्षेत्रावरील खरिपाची पिकांनी माना टाकल्या होत्या. हवालदिल झालेला शेतकरी पावसाची प्रतीक्षा करत होता. दरम्यान मंगळवारी (ता. 15) व बुधवारी (ता. 16) जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे करपण्याच्या मार्गावरील पिकांना अल्पसा दिलासा मिळाला.

गत दोन दिवस झालेल्या पावसामुळे बाळापूर तालुक्‍यामधील उरळ व बाळापूर महसूल मंडळातील 12 गावांमध्ये नुकसान झाले. या गावांमधील 908 हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाले. त्यासोबतच पावसामुळे तीन घरांचे सुद्धा अंशतः नुकसान झाले. त्यामुळे पिकांचा पंचनामा करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात येत आहे. 

आगर येथे दमदार पावसाचे आगमन शेतकरी सुखावला 
आगर येथे बुधवारी (ता. 15) मध्यरात्री पावसाचे आगमन झाल्यामुळे नदी नाल्याला, पूर आला असून शेतकऱ्यांच्या पिकांना सुद्धा जीवदान मिळाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत होते. गावातील अनेक नागरिकांनी पावसाचे आगमन व्हावे म्हणून होमहवन, महाप्रसाद, भंडारे केले.

दरम्यान बुधवारी विजांच्या कडकडाटासह आगर परिसरात दमदार पावसाचे आगमन झाल्यामुळे शेतकरी समाधानी झाला आहे. दमदार पावसामुळे मोर्णा नदीला पूर आल्यामुळे काही ठिकाणी पिकांचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या शेतात पाणीच पाणी दिसून येत आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी भरपाईची मागणी केली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: crop damage on 908 hectares due to rains; farmers are heartbroken