Akola : पिकं नष्ट झाली, प्रशासन म्हणते सर्वकाही आलबेल! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nana Patole

Akola : पिकं नष्ट झाली, प्रशासन म्हणते सर्वकाही आलबेल!

अकोला : अतिवृष्टीने पिके धोक्यात आलीआहे. कपाशी पिकांना दोन बोंड्याही लागतील की नाही, अशी अवस्था आहे. सोयाबीनला बुरशी लागली आहे. असे असताना प्रशासनाकडून करण्यात आलेल्या सर्वेत सर्वकाही आलेबेल असल्याचा दावा जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आला असून, ५० टक्के पेक्षा जास्त उत्पादन होईल, असे सांगितले जात आहे. शेतकऱ्यांना अद्याप मदत नाही. येथील प्रशासनासोबत राज्यातील सरकारही शेतकरी विरोधी असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

अकोला येथे शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भारत जोडे यात्रेच्या निमित्ताने दोन दिवसांपासून अकोला जिल्हा दौऱ्यावर असलेले नाना पटोले यांनी शेतकरी, व्यापारी, कामगार, विद्यार्थी, विविध सामाजिक संघटनांची भेट घेतली. प्रत्यक्ष पाहणी केली. त्यातून दिसून आलेले वास्तव व प्रशासनसोबत केलेल्या चर्चेतून प्रशासन करीत असलेला दावा यातील विरोधाभासच नानांनी पत्रकार परिषदेत मांडला. अतिवृष्टीने शेतकरी हवालदिल झाला असताना प्रशासन मात्र पिकांबाबत जिल्ह्यात सर्वकाही आलबेल असल्याचा दावा करीत असल्याचे ते म्हणाले.

शेतकऱ्यांना मदत देण्याऐवजी उत्पादन कसे ५० टक्के पेक्षा अधिक होणार आहे, हे सांगणारे सर्व्हेक्षण अहवाल तयार केले जात असल्याचा आरोप नानांनी पत्रकार परिषदेत केला. या पत्रकार परिषदेला नानांसोबत काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष संध्याताई सव्वालाखे, श्याम उमाळकर, अशोक अमानकर, डॉ. प्रशांत वानखडे, प्रकाश तायडे, मदन भरगड, साजिद खान पठाण, डॉ. झिशान हुसेन, डॉ. संजीवणी बिघाडे, डॉ. सुधीर ढोणे, माजी आमदार बबनराव चौधरी, जावेद अन्सारी, भानुदास माळी, जि.प. सदस्य चंद्रशेखर चिंचोळकर, प्रदीप वखारिया, कपिल ढोके, विजय देशमुख, डॉ. सुभाषचंद्र कोरपे, कपिल रावदेव, रवी शिंदे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

अकोल्यात भाजपने दहशत निर्माण केली

शहरात भयावह स्थिती आहे. मालमत्ता कर वाढविला आहे. जीएसटीचा मार सुरूच आहे. भाजपच्या ताब्यात असलेल्या मनपाने नवीन बांधकाम परवानगी देताना अडवणुकीचे धोरण अवलंबिले होते. सध्या कंत्राटी कर्मचाऱ्यांबळावर नगररचनाचा कारभार सुरू आहे. अकोल्यात भाजपने भ्रष्टाचार वाढविण्याचे काम केले. त्याविरोधात कुणी बोलला तर त्याची मालमत्ता बुलडोजर चालवून पाडण्याचे काम सुरू आहे. भाजपकडून दहशत निर्माण करण्याचे काम अकोल्यात सुरू असल्याचा घणाघाती आरोप नाना पटोले यांनी केला.

महागाईत मध्यमवर्ग पिसला

सध्या प्रचंड महागाई सर्वच क्षेत्रात वाढली आहे. त्याचा परिणाम सर्वाधिक मध्यमवर्गीयांना बसला असून, महागाईत हा वर्ग पिसला जात आहे. त्यावर कुणीही बोलायला तयार नाही, अशी परिस्थिती आहे. महागाई नियंत्रणात आणण्यासाठी कोणतेही प्रयत्न होताना दिसत नसल्याचे नाना पटोले म्हणाले.

सर्वच पक्षांना निमंत्रण

भारत जोडो यात्रेत सर्वांना सोबत घेवून चालण्याचा प्रयत्न आहे. भाजपसोडून सर्वांनाच या यात्रेत सहभागी होण्याचे निमंत्रण दिले जाईल. अगदी शिवसेनेलाही भारत जोडो यात्रेत सहभागी होण्याचे निमंत्रण देवू. वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनाही निमंत्रण देण्यासाठी जाणार असल्याची माहिती नाना पटोले यांनी दिली.