esakal | सकाळी उसळली गर्दी; दुपारी निर्मनुष्य!

बोलून बातमी शोधा

सकाळी उसळली गर्दी; दुपारी निर्मनुष्य!

सकाळी उसळली गर्दी; दुपारी निर्मनुष्य!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवेची दुकाने सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंतच सुरू ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जारी केले आहेत.

सदर आदेशाची बुधवारी (ता. २१) महानगरात पहिल्याच दिवशी काटेकोर अंमलबजावणीच्या झाल्याचे दिसून आले. किराणा, भाजीपाला व इतर अत्यावश्यक सेवेतील वस्तुंच्या खरेदीची वेळ कमी झाल्याने सकाळी बाजारात ग्राहकांची खरेदीसाठी गर्दी झाल्याचे दिसून आले. मोठ्या प्रमाणात वाहन चालक सुद्धा रस्त्यांवर आवागमन करताना दिसून आले. परंतु ११ वाजतानंतर चौकाचौकात पोलिसांनी वाहन चालकांची विचारपूस केल्यामुळे नंतर रस्ते सामसूम झाल्याचे दिसून आले.

संपूर्ण राज्यसह जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे राज्य शासनाने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना लागू केल्या आहेत. त्यासोबतच कडक निर्बंध सुद्धा लावले आहेत. परंतु त्यानंतर सुद्धा कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने राज्य शासनाने संपूर्ण राज्यातील अत्यावश्यक सेवेची दुकाने आता सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंतच सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

परिणामी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी मंगळवारी (ता. २०) जिल्ह्यातील सर्व अत्यावश्यक सेवेची दुकाने सकाळी ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश जारी केले. सदर आदेशाची बुधवारी (ता. २१) महानगरात काटेकोट अंमलबजावणी करण्यात आली. महानगरातील बहुतांश किराणा दुकाने, भाजीपाला-फळ विक्रेत्यांची दुकाने सकाळी ११ वाजेपर्यंत सुरू होती. त्यानंतर मात्र पोलिसांचे वाहन बाजारात फिरल्यानंतर बाजारातील दुकाने व्यापाऱ्यांनी बंद केली.

जनता भाजी बाजारातील दुकाने पोलिसांनी केली बंद

मिनी लॉकडाउनच्या आदेशाच्या अंमलबजावणीच्या पहिल्या दिवशी ११ वाजल्यानंतर सुद्धा स्थानिक जनता भाजी बाजारातील काही फळ विक्रेते, अत्यावश्यक सेवा देणाऱ्या दुकानदारांनी त्यांची दुकाने सुरू ठेवली. त्यामुळे गस्तीवर असताना शहर उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन कदम व सिटी कोतवाली पोलीस ठाण्याचे ठाणेदार उत्तम जाधव यांनी खुले नाट्‍य गृह रस्त्यापासून अकोट स्टँडकडे जाणाऱ्या रस्त्यावरील फळ विक्रीची दुकाने (हात ठेले) बंद केली. त्यानंतर त्यांचा ताफा जनता भाजीबाजराकडे वळला. यावेळी त्यांनी बाजारातील ठोक विक्रेत्यांसह किरकोळ फळ विक्रेत्यांना त्यांची दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. पोलिसांचा ताफा जनता भाजी बाजारात पोहचताच भाजीपाला विक्रेत्यांनीही त्यांची दुकाने बंद केली.

अकरा पर्यंतच नागरिकांना देण्यात आले पेट्रोल

सर्वसामान्य नागरिकांना पेट्रोल मिळावे यासाठी सकाळी ११ वाजताची वेळी निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे बुधवारी १०. ३० वाजतानंतर काही पेट्रोल पंपांवर वाहन चालकांची गर्दी पाहायला मिळाली. यावेळी ११ वाजेपर्यंत जे वाहनधारक पेट्रोल भरण्यासाठी रांगेमध्ये उभे राहिले होते त्यांनाच पेट्रोल पंप मालकाकडून पेट्रोल देण्यात आले. त्यानंतर येणाऱ्या नागरिकांना पेट्रोल न देताच परत पाठवण्यात आले.

पोलिस अधीक्षक उतरले रस्त्यावर

मिनी लॉकडाउनची अंमलबजावणी करण्यासाठी बुधवारी (ता. २१) सकाळी ११ वाजता जिल्हा पोलिस अधीक्षक जी श्रीधर रस्त्यावर उतरले. त्यांनी ११ वाजतानंतर राणी सती धाम येथून जाणाऱ्या येणाऱ्यांची वाहने थांबवली. त्यानंतर ते गांधी चौकात पोहचले. यावेळी विणा कारण फिरणाऱ्यांना त्यांनी जाब विचारला. त्यानंतर ते पायी सिटी कोतवाली पोलिस ठाण्यापर्यंत पोहचले. याठिकाणी सुद्धा ऑटो चालक व इतर वाहन चालकांना त्यांनी अडवले नंतर ते जयहिंद चौकाकडे रवाना झाले. सिंधी कॅम्प परिसरात सुद्धा त्यांनी रस्‍त्यावर उतरून नियम मोडणाऱ्यांवर कारवाई केली.

संपादन - विवेक मेतकर