Akola : प्रभाग रचनेची उत्सुकता शिगेला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रभाग रचनेची उत्सुकता शिगेला

प्रभाग रचनेची उत्सुकता शिगेला

अकोला : प्रभागाचा कच्चा आराखडा तयार करण्यात येत आहे. त्यासाठी ३० नोव्हेंबरची मुदत आहे. महापालिकेतील अधिकारी प्रभागाचा कच्चा आराखडा तयार करण्यात व्यस्त आहेत. सध्याच्या प्रभागातील कुठला भाग कापला जाणार? प्राबल्य असलेला परिसर तर जाणार नाही ना? अशा अनेक शंकांनी नगरसेवकांना ग्रासले आहेत. प्रभागरचनेच्या उत्सुकतेपोटी नगरसेवकांकडून दररोज अधिकाऱ्यांकडे प्रभाग रजनेबाबत विचारणा होत आहे.

राज्य सरकारने नगरसेवकांच्या संख्येत वाढ करण्याच्या निर्णय घेतल्याने प्रभागाच्या संख्येतही वाढ होणार आहे. त्यामुळे तीन सदस्यीय प्रभागरचनेनुसार कच्चा आराखडा तयार करण्याचे काम संपुष्टात येत असतानाच नव्याने वाढणाऱ्या प्रभागामुळे कच्च्या आराखड्यात अधिकारी पुन्हा फेरबदल करीत आहेत. राज्य निवडणूक आयोगाने ऑगस्टमध्ये एक सदस्यीय वॉर्डनुसार कच्चा आराखडा तयार करण्याचे आदेश सर्व महापालिकांना दिले होते. त्यानुसार अकोला महापालिकेतही एक सदस्यीय वॉर्डनुसार कच्चा आराखडा तयार करण्याचे काम सुरू झाले होते.

महिनाभराने राज्य सरकारने ता.२३ सप्टेंबरला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुंबईवगळता सर्व महापालिकांमध्ये तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीचा निर्णय घेतला. त्यामुळे एक सदस्यीय वॉर्डनुसार कच्चा आराखड्याचे काम अंतिम टप्प्यात असतानाच महापालिकेतील अधिकाऱ्यांना नव्याने तीन सदस्यीय प्रभागानुसार अकोला महापालिका क्षेत्रात २७ प्रभागांचा कच्चा आराखडा तयार करावा लागला.

तीन सदस्यीय आराखड्याचे काम जवळपास पूर्ण होत आले असतानाच सदस्य संख्येत वाढ झाली. त्यामुळे पुन्हा प्रभागांची संख्या वाढणार असल्याने नव्याने कच्चा आराखडा तयार करण्यात येत आहे. एकच काम अनेकदा करावे लागत असल्याने अधिकारीही त्रस्त झाले आहेत. त्यात नगरसेवकांकडून प्रभागाच्या रचनेबाबत वारंवार विचारना होत असल्याने प्रशासनाला काय उत्तर द्यावे, हेही कळेनासे झाले आहे.

प्रभाग रचनेबाबत गोपनियता

अकोला महानगरपालिकेची सदस्य संख्या ९१ झाली आहे. त्यानुसार तीन सदस्यांचा एक प्रभाग या प्रमाणे एकूण ३० प्रभागांची नव्याने रचना केली जाणार आहे. एका प्रभागात चार सदस्य राहतील. त्यामुळे प्रभाग रचना करताना मनपा नगररचना विभागाकडून कमालीची गोपनियता पाळली जात आहे.

loading image
go to top