esakal | ऑनलाइन बुकिंगची धूम, काही मिनिटात बुकिंग फुल्लं!
sakal

बोलून बातमी शोधा

ऑनलाइन बुकिंगची धूम, काही मिनिटात बुकिंग फुल्लं!

ऑनलाइन बुकिंगची धूम, काही मिनिटात बुकिंग फुल्लं!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला ः कोविड-१९ करीता लसीकरण मोहीम सुरू असून, १ मे २०२१ पासून १८ ते ४५ वयोगटातील व्यक्तींसाठी सुद्धा लसीकरण सुरू झाले आहे. या गटातील व्यक्तींची संख्या सर्वाधिक असल्याने मोहीमेला चांगलीच गती आली आहे. लसीकरणासाठी ऑनलाइन बुकिंग करताना स्पर्धा होत असून, संबंधित तारखेला लसीची संख्या उपलब्ध होताच काही मिनिटाच्या आत सर्व बुकिंग फुल्लं होत असल्याचे चित्र आहे.

कोविड-१९ चा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून, तो रोखण्यासाठी शासनाचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. कोरोनाला हरविण्यासाठी सोशल डिस्टंन्सिंग, वेळोवेळी साबणाने हात धुणे, मास्क लावणे इत्यादीसोबतच लसीकरण करून घेणे सर्वात महत्त्वाचे आहे. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात कोरोना योद्ध्यांना लस देण्यात आली. दुसऱ्या टप्‍प्यात ६० वर्षांवरील नागरिक व ४५ ते ६० वयोगटातील आरोग्य विषयक समस्या असलेल्या नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. १ मे २०२१ पासून तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला सुरुवात झाली असून, यामध्ये १८ ते ४५ वयोगटातील सर्वच नागरिकांना लस दिली जाणार आहे. त्यासाठी मात्र, आधी ऑनलाइन नोंदणी व बुकिंग करणे गरजेचे आहे. आता सर्वांनाच लसीकरणाचे महत्त्व पटलेले असून, ऑनलाइन नोंदणी व बुकिंग करण्यासाठी सर्व नागरिक प्राधान्य देत आहेत. त्यामुळे शासनाने दिलेल्या लिंक, ॲपवर लसीची उपलब्धता मिळताच अवघ्या काही मिनिटाच्या आत बुकिंग फुल्लं होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

लसीकरण केंद्र व लसीची उपलब्धता वाढविण्याची मागणी

जिल्‍ह्यात सध्या मोजक्याच केंद्रावर १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. शिवाय दररोज उपलब्ध होणाऱ्या लस साठ्याच्या तुलनेत नागरिकांची संख्या अधिक आहे. त्यामुळे जिल्ह्यात लसीकरण केंद्र व लसीची उपलब्धता वाढविण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

योद्धे हो तुम्ही वाचलात, दुसऱ्यालाही वाचवा!

गेल्या वर्षभरापासून जिल्ह्यात पंचवीस हजाराच्यावर कोरोना रुग्ण ठणठणीत बरे झाले आहेत. सध्या जिल्ह्यात कोरोनाचा कहर जोरात आहे. अनेकांचे श्वास कोंडले आहेत. अनेकजण जीवनरक्षक प्रणालीवर श्वास घेत आहेत. या परिस्थीतीत कोरोनाची लागण झाल्यानंतर ठणठणीत झालेल्या नागरिकांच्या रक्तातील प्लाझमा अनेकांचे जीव वाचवू शकते. या कोरोनाशी दोन हात करणाऱ्या या कोरोना योद्ध्यांनी आता उपचार घेत असलेल्या कोरोना बाधितांचे जीव वाचविण्यासाठी पुढे येण्याची गरज निर्माण झाली आहे. प्लाझमा थेरपी हा शेवटचा उपाय नसला, तरी अ‍ॅन्टीबॉडी कमतरता भरून निघण्यास मदत होणार आहे. याबाबत सामाजिक संस्थानी पुढाकार घेवून जनजागृती करण्याची गरज आहे.

संपादन - विवेक मेतकर

loading image