वऱ्हाडात धुवाधार!, हवामान विभागाचे संकेत; वऱ्हाडात मॉन्सून सक्रिय

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 16 June 2020

संपूर्ण विदर्भात सध्या सरासरी आर्द्रता ८० टक्क्याहून अधिक असून, वऱ्हाडात मॉनसून सक्रिय आहे. त्यामुळे पुढील ४८ तास अकोला, बुलडाणा, वाशीम जिल्ह्यात जोरदार पाऊस पडणार असल्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.

अकोला  ः संपूर्ण विदर्भात सध्या सरासरी आर्द्रता ८० टक्क्याहून अधिक असून, वऱ्हाडात मॉनसून सक्रिय आहे. त्यामुळे पुढील ४८ तास अकोला, बुलडाणा, वाशीम जिल्ह्यात जोरदार पाऊस पडणार असल्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.

राज्यासह विदर्भात २ जूनपर्यंत मॉन्सूनचे आगमण होणार असल्याचे भाकीत हवामान विभागाने केले होते. मात्र मध्यंतरी समुद्रात ‘ॲम्फन व निसर्ग’ या दोन वादळाची निर्मिती झाल्याने मॉन्सूनचे आगमण लांबले. आता मात्र अकोला, वाशीम, बुलडाणा जिल्ह्यात मॉन्सून सक्रिय असून, विविध भागात जोरदार पावसाने हजेरी सुद्धा लावली आहे. आता पुढील संपुर्ण आठवडा जिल्ह्यासह वऱ्हाडात पावसाचा जोर राहणार असल्याने, खरिपासाठी पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

मॉन्सूनचा जोर
मॉन्सून ओरिसा, झारखंड, बिहार राज्यात पोहचला आहे. मागच्या २४ तासात राज्यात मॉन्सून सक्रिय होता आणि पुढील २४ तास असाच सक्रीय राहणार आहे. येत्या ४८ तासात कोकण आणि मुंबई मध्ये अतिवृष्टीची चेतावणी हवामान विभागाने दिली आहे. कोकण सोबत नाशिक, पुणे, सातारा, सोलापूर, नगर, बीड, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, यवतमाळ, नांदेड, लातूर इत्यादी जिल्ह्यासोबत पूर्व विदर्भातील सर्व जिल्हात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असून, अमरावती, नागपूर, गोंदिया, भंडारा, अकोला, बुलडाणा, वाशीम जिल्हात जोरदार पावसाची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तविली आहे.

राज्यात सर्व जिल्ह्यांमध्ये आद्रता ८० टक्क्यापर्यंत वाढलेली दिसून येत असून, साधारण ८० ते १०० मिमी पेक्षा जास्त पाऊस झालेला आहे. या आठवड्यात हीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे तर, अकोला वाशीम, बुलडाणा जिल्ह्यात मॉन्सून सक्रिय असून, पुढील दोन दिवस जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
- संजय अप्तुरकर, हवामान तज्ज्ञ, नागपूर

वाऱ्याची दिशा
कोकण आणि लगतच्या परिसरात पश्चिम दिशेकडून, विदर्भ मराठवाडा विभागात नैऋत्येस वाऱ्याची दिशा राहण्याची शक्यता आहे. गोंदिया, भंडारा, गडचिरोली आणि छत्तीसगड सीमा परिसरात ती उत्तर, उत्तर-पूर्व दिशेकडून राहण्याची शक्यता असून, गती सर्वत्र सामान्य म्हणजे ताशी ३० किमी पर्यंत राहणार असल्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तविली आहे.

पेरणीची लगबग
६५ ते १०० मिमी पाऊस पेरणीसाठी योग्य सांगण्यात येतो. सोमवार (ता.१५) सकाळपर्यंत जिल्ह्यात ६४.२३ टक्के पाऊस पडला होता. त्यामुळे पेरणीसाठी सज्ज असलेल्या शेतकऱ्यांना अजून एका जोरदार पावसाची प्रतीक्षा होती. मात्र सोमवारी दुपारनंतरच जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने, शेतकऱ्यांनी खरीप पेरणीसाठी लगबग सुरू केली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dhuvadhar in akola, buldana, washim district !, weather department signs; Monsoon active in Varhad