आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्याचे निवडणूक निर्णय अधिकार्यांचे सर्व पक्षीयांना आवाहन

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 19 November 2020

यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी श्री. सिंह यांनी आचारसंहितेच्या अनुषंगाने विविध नियमांची माहिती उमेदवारांना दिली. मतदान प्रक्रियेबाबत मार्गदर्शनपर चित्रफीतही उमेदवार व प्रतिनिधींना दाखविण्यात आली. डमी मतपत्रिका, मतदारचिठ्ठी, मतदानाची पद्धती, मतदानासाठी अनुज्ञेय ओळखपत्रे आदी बाबींची माहितीही श्री. सिंह यांनी उमेदवार व प्रतिनिधींना दिली.

अकोला : शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या उमेदवारांनी निवडणूक आयोगाने निश्चित करून दिलेल्या आचारसंहिता व नियमावलीचे सर्व उमेदवारांनी काटेकोर पालन करावे, अशा सूचना निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त पीयुष सिंह यांनी आज येथे दिल्या.

निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वपक्षीय उमेदवारांची बैठक आज विभागीय आयुक्त कार्यालयात झाली, त्यावेळी ते बोलत होते. उपायुक्त गजेंद्र बावणे, उपायुक्त प्रमोद देशमुख, सहायक आयुक्त विवेकानंद काळकर यांच्यासह विविध पक्षांचे उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

हे ही वाचा : काटेपुर्णा प्रकल्पाच्या पाण्यातून पाणी वापर संस्थेच्या लाभधारक शेतकऱ्यांनी फुलवली गहू हरभरा पिकांची बाग..! 

यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी श्री. सिंह यांनी आचारसंहितेच्या अनुषंगाने विविध नियमांची माहिती उमेदवारांना दिली. मतदान प्रक्रियेबाबत मार्गदर्शनपर चित्रफीतही उमेदवार व प्रतिनिधींना दाखविण्यात आली. डमी मतपत्रिका, मतदारचिठ्ठी, मतदानाची पद्धती, मतदानासाठी अनुज्ञेय ओळखपत्रे आदी बाबींची माहितीही श्री. सिंह यांनी उमेदवार व प्रतिनिधींना दिली.

वाहन परवानगी

त्यानुसार जिल्ह्यांतर्गत प्रचार वाहनांची परवानगी संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिका-यांकडून, तर संपूर्ण मतदारसंघात प्रचारासाठी वाहन परवानगी विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाकडून प्राप्त करून घेणे बंधनकारक आहे.

प्रचार साहित्य छपाई

प्रचार साहित्यावर मुद्रक, प्रकाशक यांचे नाव, पत्ता व प्रतींची संख्या दर्शविणे आवश्यक आहे. छपाईपूर्वी मुद्रकाने प्रकाशक व उमेदवाराचे दोन अनुमोदक यांच्याकडून दोन प्रतीत घोषणापत्र घेणे आवश्यक आहे. छपाईनंतर मुद्रकाने 10 दिवसांच्या आत साहित्याच्या चार प्रती जिल्हा दंडाधिका-यांकडे प्रकाशकाच्या घोषणापत्रासह पाठवाव्यात. प्रचारासाठी छापावयाच्या प्रत्येक साहित्याचे नमुने जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडून प्रमाणित करून घ्यावा. या तरतुदींचे उल्लंघन केल्यास 6 महिने कारावास व 200 रूपये दंड होऊ शकतो.

समाजमाध्यम, बल्क एसएमएस आदी स्वरूपाचा इलेक्ट्रॉनिक प्रचार मजकूर जिल्हाधिकारी स्तरावरील माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समितीकडून प्रमाणित करूनच प्रचारासाठी वापरावा, अशीही सूचना त्यांनी केली.

कोविड-19 प्रादुर्भाव लक्षात घेऊन आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू असल्याने प्रचार सभांना परवानगी नाही. निवडणूक रॅलीला परवानगी आहे. मात्र, सुरक्षा उपाययोजनेचा भाग म्हणून वाहनाचा ताफा पाच-पाचच्या गटात विभागणी करण्यात यावी व प्रत्येक पाच वाहनांच्या गटानंतर अर्ध्या तासाचे अंतर राखण्यात यावे. रॅली, गृहभेटी यांचे व्हिडीओ चित्रीकरण करण्यात यावे.

शपथपत्रात नमूद गुन्ह्यांबाबत जाहीर प्रकटन आवश्यक

उमेदवाराच्या शपथपत्रात गुन्हेगारी स्वरूपाची कारवाई झाल्याचे घोषित असेल तर उमेदवारी निश्चितीपासून मतदानाच्या दिवसापर्यंत त्यास प्राधिकृत      करणा-या राजकीय पक्षाने उमेदवाराने केलेल्या गुन्हे नोंदीबाबत तीनवेळा प्रसिद्धी देणे आवश्यक आहे.

डमी मतपत्रिका

डमी मतपत्रिका कोणत्याही परिस्थितीत निवडणूक आयोगाच्या मतपत्रिकेच्या साईज व रंगाची अर्थात गुलाबी किंवा पांढरा रंग वापरू नये. डमी मतपत्रिकेत स्वत: उमेदवाराचे नाव छापता येईल. मात्र, इतर उमेदवारांची नावे छापू नयेत. मतदार चिठ्ठी केवळ पांढ-या कागदावर छापता येईल. राजकीय पक्षाचे चिन्ह किंवा उमेदवाराची ओळख पटेल असा मजकूर त्यावर असू नये, आदी विविध सूचना यावेळी निवडणूक निर्णय अधिका-यांनी केल्या.

मतदारांना नाव शोधण्यासाठी संकेतस्थळ

मतदारांना नाव शोधण्यासाठी https://ceo.maharashtra.gov.in/gtsearch1 या संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध असल्याचेही त्यांनी सांगितले. कोविड-19 प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी व उमेदवारांकडून विविध प्रतिनिधी नियुक्त करताना पाळावयाच्या आवश्यक नियमांची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Divisional Commissioner Piyush Singh has instructed the candidates for the Teachers Constituency elections to abide by the Code of Conduct and Rules