
अकोला : कागदपत्र पडताळणीची गती मंदावलेलीच
अकोला - आरटीईअंतर्गत लॉटरी लागलेल्या विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यास शासनाने पुन्हा एकदा मुदतवाढ दिल्यानंतर सुद्धा विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांच्या पडताळणीची गती मंदावलेलीच असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मुदतवाढीनंतर सुद्धा आतापर्यंत केवळ १ हजार ४१२ विद्यार्थ्यांचेच प्रवेश खासगी शाळांमध्ये निश्चित करण्यात आले आहेत. बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार (आरटीई) समाजातील आर्थिक व सामाजिक दुर्बल घटकांसाठी खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात. गरीब व आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेले पालक जास्त प्रवेश शुल्क असलेल्या शाळांमधून आपल्या मुलांना शिकवू शकत नव्हते; मात्र आरटीईमुळे अशा पालकांचे त्यांच्या मुलांना खासगी शाळांमधून शिकवण्याचे स्वप्न साकार होत आहे. दरम्यान यंदा आरटीई कोट्यातून प्रवेश मिळावा, यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया शिक्षण विभागाच्या वतीने राबविण्यात आली. त्यासोबतच प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्यांची निवड लॉटरी काढून शासन स्तरावरून करण्यात आली आहे. दरम्यान लॉटरीमध्ये निवड करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या कागदपत्र पडताळणीला शासनाने पुन्हा एकदा मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे पालकांना दिलासा मिळाला असला तरी कागदपत्र पडताळणीची गती मात्र मंदावलेलीच आहे.
प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रतीक्षाच
आरटीई अंतर्गत प्रवेशासाठी ज्या बालकांचे नाव प्रतीक्षा यादीत आहे त्यांच्यासाठी अद्याप प्रवेश प्रक्रिया सुरूच झाली नाही. प्रतीक्षा यादीत नाव असलेल्यांनी ॲडमिट कार्डची प्रिंट काढू नये, प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश सुरू झाले कि आरटीई पोर्टलवर सूचना देण्यात येतील व एसएमएस येतील मगच प्रिंट काढावी, असे आवाहन शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
अशी आहे
आरटीईची स्थिती
नोंदणीकृत शाळा - १९६
आरक्षित जागा - १९९५
प्राप्त अर्ज - ६००३
जास्त प्राप्त अर्ज - ४००७
लॉटरी लागलेले - १९२०
प्रवेशित विद्यार्थी - १४१२