Dr. Babasaheb Ambedkar Jayanti : तुला देव म्हणावं की भीमराव म्हणावं...

तू इतकं दिलं आम्हा हे कधी सरावं; अशोक वाटिकेवर लोटला जनसागर
dr. babasaheb ambedkar jayanti
dr. babasaheb ambedkar jayantisakal
Updated on

अकोला - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती सोमवारी (ता. १४) जिल्ह्यात उत्साहात साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त स्थानिक अशोक वाटिकेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्यास हार, फुलं वाहण्यासाठी अलोट जनसागर उसळला.

जयंतीनिमित्त सोमवारची सायंकाळ भीम अनुयायांच्या उत्साहाने फुलून गेल्याचे दिसून आले. ढोल, ताशा आणि वाद्य यंत्रांच्या तालावर तरुणाईने ठेका धरला होता. तू इतकं दिल आम्हा हे कधी सराव... भीम शंभर नंबरी सोन महुच्या मातीच... या व इतर भीम गीतांनी १४ एप्रिलच्या सायंकाळी आसमंत दुमदुमला होता.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती निमित्त अशोक वाटिकेतील डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याला मानवंदना देण्यासाठी सोमवारी (ता. १४) शहरातील विविध भागातून नागरिकांचा गर्दी उसळली. सकाळी विविध भागातून दुचाकी रॅली काढून भीमसैनिक अशोक वाटिकेत पोहोचले.

त्याठिकाणी त्यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्यास हार, फूल अर्पण केले. महिला व युवतीसुद्धा डॉ. बाबासाहेबांची जयंती साजरी करण्यासाठी मोठ्या संख्येने अशोक वाटिकेत उपस्थित होत्या. सकाळनंतर दुपारी उन्हाची तीव्रता ४० अंशावर गेलेली असलताना सुद्धा शेकडो भीम अनुयायांची अशोक वाटिकेत गर्दी पाहायला मिळाली.

उन्हाचा पारा कमी झाल्यानंतर संध्याकाळी अशोक वाटिकेत हजारो अनुयायी जयंती उत्सव साजरा करण्यासाठी पोहोचले. रात्रीच्या वेळेस हार, फूल अर्पण करणाऱ्यांमध्ये महिला व युवतींनी मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला. डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ मोमबत्तीच्या प्रकाशाने अशोक वाटिका परिसर उजळून निघाला.

याठिकाणी दिवसभर विविध सामाजिक उपक्रमांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. रात्री उशीरापर्यंत भीम अनुयायांची अशोक वाटिकेत गर्दी उसळल्याने या मार्गावर अलोट गर्दी दिसून आली.

गीतांना आसमंत दुमदुमला

‘भीमराया घे तुझ्या या लेकराची वंदना...’, ‘जयभीम...जयभीम...’, ‘जब तक सूरज चॉंद रहेगा, बाबा तेरा नाम रहेगा’, ज्याचा रूबाब राजेशाही... जगात गाजा वाजा...भीमराव एकच राजा..., अशा घोषणांनी सोमवारी शहर दुमदुमले. हजारो युवकांनी व युवतींनी निळे फेटे परिधान करून दुचाकींवर शहरातून रॅली काढली. शहरातील विविध भागातून हजारो युवक, युवती अशोक वाटिकेत पोहोचले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी केली.

देखावे; ‘आय लव्ह आंबेडकर’ने वेधले लक्ष

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त शहरातील विविध चौकात देखावे साकार करण्यात आले होते. नवीन बस स्थानक चौकासह मुख्य डाक घर चौक, जुने शहरातील भीम नगर चौक, डाबकी रोड वरील आंबेडकर ग्राउंड समोर डॉ. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी भीम जयंतीचे तैलचित्र व देखावे लावण्यात आले होते. डाबकी रोडवरील मुख्य रस्त्यावर ‘आय लव्ह आंबेडकर’चे मोठे डिजिटल बॅनर प्रत्येकाचे लक्ष वेधून घेत होते. त्यासोबतच चौकांमध्ये सायंकाळी भीम गीतांनी आसमंत दुमदुमला होता.

अनुयायांसाठी मोफत शरबत वाटप

अशोक वाटिकेत डॉ. बाबासाहेबांची जयंती साजरी करण्यासाठी येणाऱ्या अनुयायांना विविध स्वयंसेवी संस्थांच्यावतीने पाणी व शरबत व मसाला भात वाटप करण्यात आला. अशोक वाटिकेच्या बाहेर स्टेट बॅंक कर्मचारी संघटनेच्या वतीने मोफत बुंदी, तर अकोला अर्बन बॅंकेच्या वतीने मोफत कैरी पन्ह्याचे वाटप करण्यात आले.

मूर्त्या; पुस्तकांनी फुलला परिसर

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त अशोक वाटिकेत येणाऱ्या बौद्ध अनुयायांची संख्या पाहता या परिसरात विविध प्रकारची दुकाने सजली होती. निळे व पंचशिलाचे झेंडे नागरिकांचे लक्ष आकर्षित करत होते.

त्याव्यतिरिक्त गौतम बुद्ध व डॉ. आंबेडकरांच्या विविध भावमुद्रेतील मूर्त्या परिसरात विक्रीसाठी उपलब्ध होत्या. त्याचप्रमाणे बाबासाहेबांनी लिहिलेली पुस्तके व बुद्ध धम्माची पुस्तके विविध दुकानदारांनी अशोक वाटिका परिसरात विक्रीसाठी ठेवली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com