परतीच्या पावसापूर्वीच सिंचन प्रकल्प भरले

सुगत खाडे
Sunday, 11 October 2020

विशेष म्हणजे यावर्षी परतीचा पाऊस होण्यापूर्वीच धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा जमा झाल्याने सिंचनाला पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

अकोला : काही दिवसांपूर्वी जिल्ह्यात दमदार पाऊस झाल्याने जल सिंचन प्रकल्पांमध्ये मुबलक प्रमाणात पाणीसाठा जमा झाला आहे. काही प्रकल्प तर ओव्हर फ्लो झाले आहेत. दरम्यान जिल्ह्यातील सर्वात मोठ्‍या बार्शीटाकळी तालुक्यातील महान येथील काटेपूर्णा जल प्रकल्प सुद्धा भरले असून या प्रकल्पातून नियमित पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. याव्यतिरिक्त निर्गुणा, मोर्णा, उमा प्रकल्पात शंभर टक्के पाणीसाठा जमा झाला असून वान प्रकल्पात ९७ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. विशेष म्हणजे यावर्षी परतीचा पाऊस होण्यापूर्वीच धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा जमा झाल्याने सिंचनाला पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

राज्यात मॉन्सूनचे ११ जून रोजी आगमन झाले. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या दक्षिण भागात मॉन्सूनने प्रगती केली. त्यानंतर मॉन्सूनने संपूर्ण देश व्यापल्याचा दावा हवामान खात्याने केला होता. असे असल्यानंतर सुद्धा जिल्ह्यात पावसाने दांडी मारली होती. त्यामुळे धरणांची पाणीपातळी तळ गाठत होती. पावसाच्या लहरीपणामुळे जिल्ह्यातील धरणांमध्ये संग्रहित असलेल्या पाण्याचा वापर सुद्धा वाढला होता. शहरी व ग्रामीण भागात पाणीपुरवठा करण्यासाठी साठवलेल्या पाण्याची उचल वाढली होती.

धरणांच्या पाणीसाठ्यात सुद्धा घट होत होती. या स्थितीमुळे जिल्हावासियांना पेयजल संकटाला सुद्धा सामोरे जावे लागू शकते, अशी शक्‍यता वर्तवण्यात येत होती. परंतु मध्यतंरीच्या काळात जिल्ह्यात सतत पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्यातील लघू सिंचन प्रकल्प ओव्हर फ्लो झाले, मध्यम प्रकल्पांवरुन सुद्धा पाणी ओसंडून वाहू लागले. विशेष म्हणजे अद्याप पावसाच्या परतीचा प्रवास सुरूच होण्यापूर्वीच धरणात मुबलक पाणीसाठा जमा झाल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साह आहे.

असा आहे पाणीसाठा

जिल्ह्यात सर्वात मोठ्या काटेपूर्णा धरणात ९९.६६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. वान वान प्रकल्पात ९७.०३ टक्के, निर्गुणा, मोर्णा, उमा प्रकल्प पूर्णतः भरले आहेत. घुंगशी बॅरेजमध्ये सुद्धा ६७.८१ टक्के पाणीसाठा जमा आहे.

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Due to heavy rains in Akola district, abundant water has accumulated in irrigation projects