Akola : सावधान... पुढे धुळीचे शहर आहे! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Akola

Akola : सावधान... पुढे धुळीचे शहर आहे!

अकोट : शहरात सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरले असून, अकोटवासी पुरते हैराण झाले आहेत. कोरोना संसर्ग कमी झाल्यानंतर मास्कची सक्ती हटली होती. परंतु, शहराची बकाल अवस्था करणाऱ्या व्यवस्थेने नागरिकांना पुन्हा मास्क लावून शहरात फिरायला लावल्याची वेळ आणली असल्याचे दिसून येत आहे.

काही व्हॉट्सॲप ग्रुप तथा अन्य समाजमाध्यमांवर ‘अकोटला धुळमुक्त करा’..., लोकांना जगू द्या हा ट्रेंड चांगलाच व्हायरल होत असून, विकासाच्या नावावर विधानसभा निवडणुकीत लाटेत निवडून आलेल्या पुढाऱ्यांना चांगलेच ट्रोल केले जात आहे. शहरात पाहुणे दाखल होताच वाटेतच सावधान पुढे धुळीचे शहर आहे...,असे हिणावत शहरातील रस्ते वाहतूक व्यवस्थेची खिल्ली उडवताना दिसत आहेत. अकोट मतदार संघातील सर्वच रस्त्यांची दुरवस्था झाली असून, वाहनांमुळे, तसेच रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये टाकण्यात आलेल्या मतिमिश्रित मुरुमामुळे धुळीचे लोट उठत असून, या सर्व प्रकारची सोशल मीडियावर खिल्ली उडवली जात आहे. अकोट-अकोला मार्गाचे काम कासवगतीने सुरू आहे, हिवरखेड ते तेल्हारापर्यंतच्या रस्त्याचे बांधकाम अद्यापही सुरू झाले नाही, शहरातील अंतर्गत रस्त्याची दुरवस्था झाली आहे, रस्त्यावर पडलेले खड्डे सुरू असलेली बांधकामे, खोदकामामुळे धूळ मोठ्या प्रमाणात होत असून, नागरिकांना धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे. अशातच नातेवाईक अकोटला येत असतील, तर एक ‘सदरा’ सोबतच आणावा, असे म्हणत शहरातील बकाल व्यवस्थेची खिल्ली उडवताना दिसत आहेत.

शहरात विकास कामांच्या नावाखाली रस्ते खोदून ठेवले आहेत. नगरपरिषद समोरील निर्मानधीन रस्त्यावर मतिमिश्रित घटकांचा समावेश केल्याने मच्छीसात ते धारुळी वेसपर्यंतच्या प्रवासात शहरवासीयांना धुळीचा सामना करावा लागत आहे. शहरात व शहराबाहेर जाणाऱ्या प्रमुख रस्त्यांवरून मोठ्या वाहनांमुळे धुळीचे लोळ उठतात. परिणामी, अशावेळी तेथून मार्गक्रमण करताना दुचाकीस्वारांचा कस लागतो आहे, तसेच व्यापारी वर्गही धुळीने त्रस्त झाले आहेत, तर सुरक्षिततेच्या कारणास्तव पादचाऱ्यांनादेखील तोंडाला रुमाल बांधून जावे लागते आहे.

कुठ वाहली ‘विकास गंगा’?

सततच्या पावसामुळे यापूर्वीच अकोट तालुक्यातील नागरिकांना सर्दी-ताप अशा विविध आजारांना सामोरे जावे लागले. त्यातच आता धुळीमुळे श्वसनाचे, डोळ्यांचे, त्वचेचे व अन्य आजार जडण्याची भीती असल्याने नागरिक धास्तावले आहेत, त्यामुळे सर्वच स्तरामधून लोकप्रतिनिधी विरोधात संताप व्यक्त केला जातोय. विकासाच्या मुद्द्यावर दुसऱ्यांदा सत्तेत येणाऱ्या आमदार साहेबांनी एकदा तरी शहरात रस्त्यावर फिरून नागरिकांच्या समस्या जाणून विकासाची गंगा कुठून आणि कुठे वाहली याचा स्वतः शोध घ्यावा, अशी मागणी अकोटवासी करत आहेत.

अकोला किंवा तेल्हाऱ्याकडे जाताना रस्त्यावर मुरुम पसरविला असल्याने वाहन जाताच धुळीचे लोळ उठतात, त्यामुळे समोरील वाहन व विरुद्ध दिशेने येणारे वाहन सुद्धा दिसत नाही, परिणामी या मार्गावर दररोज अपघात होत आहेत.

- मिलिंद दामोदर, वाहनचालक, अकोट.

अकोट शहरात कुठेही खड्डे पडली की, समाजमाध्यमांवर व्यक्त होऊन गप्प बसा, वाहतूक कोंडी होत असेल, तर गप्प बसा. पायाभूत सुविधांची वाट लागली असेल, तर गप्प बसा. शहराची अवस्था होण्यास ही प्रवृत्तीच कारणीभूत ठरते आहे. हे बदलण्यासाठी नागरिकांना पेटून उठावे लागेल, विधानसभा निवडणुकीत मत मागताना विकास कामांचा हिशोब द्यावा लागेल.

- विजय जितकर, सामाजिक कार्यकर्ते, अकोट.

धुळीमुळे मेटाकुटीस आलेल्या अकोटवासीयांच्या मागचे दृष्टचक्र काही केल्या संपायला तयार नाही. अगदी महिन्याभऱ्यापूर्वी तयार केलेले रस्तेही सहज उखळून जात आहेत. तालुक्यात झालेली रस्त्याची चाळण हे पावसाचे नाही, तर पोखरलेल्या व्यवस्थेचे दृश्य स्वरूप आहे.

- शैलेश सावजी, व्यावसायिक, अकोट.

अकोट हे ‘धुळप्रवण’ क्षेत्र म्हणून घोषित करायला हरकत नसावी एवढी धूळ रोडवर आहे. शहरात प्रवेश करताना ‘सावधान पुढे धुळीचे शहर आहे’, असे फलक लावले तरी कुणाची काही हरकत नसेल?

- शशांक कासवे, मनसेना, अकोट.

टॅग्स :AkolaDust