शेतकऱ्याची सोयाबीन गंजी आगीत भस्मसात

संतोष गिरडे
Saturday, 31 October 2020

गौळखेडा येथील रहिवासी मनोहर चंद्रभान साबळे यांच्या व त्यांच्या दोन भावाचे गौळखेडा शेतशिवारात गट क्र. ८७८ मध्ये पाच एकर शेती आहे. या शेतातील सोयाबीन गंजी झाकण्यासाठी (ता. २८) ऑक्टोबरला रात्री मनोहर साबळे जात असताना त्याला शेतात मोठी आग लागलेली दिसली.

शिरपूर जैन (वाशीम) : शिरपूर जैन पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या गौळखेडा येथे एका शेतकऱ्यांच्या सोयाबीन गंजीला चार जणांनी आग लावली. या आगीत शेतकऱ्यांची सोयाबीन गंजी जळून भस्मसात झाल्यामुळे एक लाख ६० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे उपरोक्त शेतकरी हतबल झाला आहे. ही दुर्दैवी घटना (ता.२८) ऑक्टोबर रोजी रात्री आठ वाजताच्या सुमारास गौळखेडा येथे घडली. ठाणेदार समाधान वाठोरे यांनी तात्काळ गौळखेडा येथे भेट दिली. आग लावणाऱ्या चार जणांविरुद्ध शिरपूर पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. 

हे ही वाचा : अभियंत्यांस हातात फलक देऊन केले खड्ड्यात उभे राहून अनोखे आंदोलन
 
गौळखेडा येथील रहिवासी मनोहर चंद्रभान साबळे यांच्या व त्यांच्या दोन भावाचे गौळखेडा शेतशिवारात गट क्र. ८७८ मध्ये पाच एकर शेती आहे. या शेतातील सोयाबीन गंजी झाकण्यासाठी (ता. २८) ऑक्टोबरला रात्री मनोहर साबळे जात असताना त्याला शेतात मोठी आग लागलेली दिसली. बघता बघता आगीने रौद्र रूप धारण केले. हा प्रकार मनोहर साबळे याने घरच्या लोकांना कळविला. त्याच्या घरचे व इतर लोक उपरोक्त घटनास्थळी पोहोचले असता सोयाबीन गंजी पूर्णपणे जळून भस्मसात झाली होती. सोयाबीनची गंजी अंदाजे ४० पोत्यांची होती. या लावलेल्या आगीत एकूण एक लाख ६० हजार रुपयांचे नुकसान झाले. त्यामुळे साबळे परिवार कमालीचा हतबल झाला आहे. 

हे ही वाचा : शरद पवारांनी दिलेला शब्द पाळला पाहिजे ही अपेक्षा - रविकांत तूपकर

या प्रकरणी मनोहर चंद्रभान साबळे (वय ३८) रा. गौळखेडा यांनी शिरपूर पोलिस स्टेशनला फिर्याद दिली. याप्रकरणी शिरपूर पोलिसांनी (ता. २९) ऑक्टोबर रोजी रात्रीला अशोक बळीराम इंगळे, अमोल आनंता साबळे, अमोल भास्कर चंद्रशेखर, रतन उत्तम साबळे सर्व (रा.गौळखेडा) या चार जणांविरुद्ध कलम ४३५, ४२७, ३४ भादवी नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार समाधान वाठोरे त्यांच्या मार्गदर्शनाखाली कॉ माणिक खानझोडे व  महादेव चव्हाण हे करीत आहेत. यापूर्वी देखील शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नावली, मांगुळ झनक व कोयाळी खुर्द येथे सोयाबीन गंजीला आग लावण्याच्या घटना घडल्या आहेत. या सलग आगीच्या घटनांमुळे शेतकरी पुरता धास्तावलेला आहे.
 
संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers in Shirpur have lost millions of rupees due to burning of soybean stubble