
अकाेला : आई-वडिलांचे छत्र हरवलेल्या युवतीचा जीवनाशी संघर्ष
बार्शीटाकळी : वडिलांच्या अपघाती मृत्यूनंतर कालांतराने आईने सुद्धा जगाचा निरोप घेतला. कुटुंबाची जबाबदारी पेलण्यासाठी मुलगी व मुलगा हे अनाथ भावंड हिमतीने पुढे आले. मुलाला मात्र, आई-वडिलांचा मृत्यू झाल्याने मानसिक धक्का बसला व तो अजूनही मानसिक दृष्ट्या सुदृढ नाही. अशातच बहिणीने हिंमत न हारता मोलमजुरी करून हा संघर्षमय जीवनाचा प्रवास पुढे नेण्याचा संकल्प केला.
बार्शीटाकळी तालुक्यातील मांडोली या आदिवासी बहुल गावात मावशीच्या घरी राहणाऱ्या दोन भावंडांची व्यथा आहे. शोभा व कैलास ही भावंडे प्रशासनाकडे जागा व हक्काचा निवारा भेटावा याकरिता पायपीट करत आहेत. कोथळी (बु.) हे वडिलोपार्जित गाव असलेले विलास गोदमले हे मूळ गाव सोडून मजुरीच्या शोधात कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी सराव येथील एका गिट्टीखदानवर राहत होते. २००३ मध्ये त्यांचा बार्शीटाकळी ते अकोला रोडवर खडकी येथे अपघाती मृत्यू झाला.
पतीच्या मृत्यूनंतर पत्नी पंचफुला गोदमले यांनी खचून न जाता गिट्टीखदानचे ठिकाण सोडून पातूर येथे एका शेतात राहून आपल्या मुलांसह मोलमजुरीचे काम सुरू केले. अशातच त्यांना आजाराने ग्रासले. शोभा व कैलास यांनी मोलमजुरीतून रक्कम गोळा करून आईच्या उपचारावर खर्च केले. शोभाने दहावीनंतरचे व व कैलासने नववीनंतरचे शिक्षणाला पूर्णविराम दिला. सर्वोपचारमध्ये उपचार झाल्याने बहिणीच्या बहिणीच्या भेटीसाठी मांडोली येथे येत असताना वाटेतच पंचफुलाबाईने जगाचा निरोप घेतला आणि दोन्ही भावंडे पोरकी झाली. आईच्या अंत्यसंस्कारानंतर शोभा व कैलास मावशीकडे राहू लागले.
शेतमजुरीचे काम करून ते उदरनिर्वाह करत आहेत. या ठिकाणी जागा व हक्काचे घर नसल्याने दोन्ही भावंडांवर संकट उभे राहिले. अशातच जाम वसू ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात मांडोली येथे शोभा व कैलासची मावशी वेणूबाई वासुदेव यांच्याकडील शासनाची जागा या भावंडांना राहण्यासाठी दिली. शोभाने आपल्या मानसिकदृष्ट्या सक्षम असलेल्या भावाला सोबत घेऊन मावशीच्या सहाऱ्याने हातमजुरी करून आपला संघर्षमय प्रवास सुरूच ठेवला. आई-वडिलांचे छत्र हरविलेल्या अनाथ भावंडांच्या पुनर्वसनासाठी प्रशासन आता मदतीच्या स्वरूपात कोणते पाऊल उचलते हे वेळच ठरवेल!
Web Title: Father Death Accident Girl Struggle With Life
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..