esakal | नवीन नियामावलीची धास्ती, अकरा वाजेपर्यंत प्रचंड गर्दी

बोलून बातमी शोधा

नवीन नियामावलीची धास्ती, अकरा वाजेपर्यंत प्रचंड गर्दी

नवीन नियामावलीची धास्ती, अकरा वाजेपर्यंत प्रचंड गर्दी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मूर्तिजापूर (जि.अकोला) : ‘ब्रेक द चेन’ या कोरोना विरोधी लढ्यातील प्रभावी आयुधाचा अवलंब बुमरँग ठरतो की काय? असा संभ्रम निर्माण करणारी गर्दी बुधवारी (ता.२१) सकाळी ११ वाजेपर्यंत मूर्तिजापूर शहरात उसळली, मात्र ११ नंतर प्रशासनाने पाश आवळताच सर्वत्र सामसूम झाली. चौका-चौकात पोलिसांनी नाकेबंदी करून नागरिकांना मुक्त फिरण्यास मज्जाव केला.


कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने लॉकडाउन अधिक कडक करत अत्यावश्यक वस्तुंची विक्री करणारी दुकाने केवळ सकाळी ७ ते ११ दरम्यान उघडण्याची परवानगी दिली आहे. परिणामतः ग्राहकांची एकच गर्दी या वेळेत सर्वत्र उसळली. दुकानांसमोर लांबच-लांब रांगा लागल्या. सोशल डिस्टन्सिंग राखण्यात व गर्दी नियंत्रित करण्यात दुकानदारांच्याही नाकी नऊ आले.

बुधवारी ११ वाजल्यानंतर पुढे काही मिळणारच नाही, या भावनेतून ग्राहकांनी केलेली तोबा गर्दी प्रशासनालाही हतबल करणारी ठरली. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचा आदेश व उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते यांच्या शानिर्देशानुसार बुधवारपासून सर्व जीवनावश्यक वस्तुंची विक्री करणारी दुकाने सकाळी ७ ते ११ दरम्यान खुली राहातील.

दूध विक्री सकाळी ७ ते ११ व संध्याकाळी ५ ते ७ दरम्यान सुरू राहाणार आहे. त्यामुळे उसळलेली ही तोबागर्दी ११ वाजल्यानंतरही हटायला तयारच नसल्याचे लक्षात येताच पालिका व पोलिस प्रशासनाने संयुक्त आघाडी उघडली. मुख्याधिकारी विजय लोहकरे व पोलिस उप निरीक्षक आशीष शिंदे यांनी दुकानदारांना दुकाने बंद करण्याचे व ग्राहकांना घरोघरी जाण्याचे नम्रपणे आवाहन केले.

परिणाम साधल्या जात नसल्याचे लक्षात येताच सक्तीचा वापर करीत पालिका व पोलिस ताफ्याच्या सहकार्याने सक्त निर्देश देण्यात आले. फटाफट सर्व प्रतिष्ठाने बंद झाली. केवळ ४ तास दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी असल्याचे आवाहन अधिकाऱ्यांनी केले व पोलिसांचा ताफा दिसताच ग्राहकही पांगले. त्यानंतर शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, शिवछत्रपती चौक, शहीद भगतसिंग चौक, मोरारजी चौक अशा प्रमुख चौकांमध्ये नाकाबंदी सुरू झाली. विनाकारण फिरणाऱ्यांना सज्जड दम भरण्यात आला. दंड आकारण्याचा इशारा देण्यात आला.

अशी केली पोलिसांनी कारवाई
सामाजिक अंतर राखण्यात असफल ठरलेल्या ४ दुकानदारांना प्रत्येकी एक हजार रुपये दंड आकारण्यात आला. मास्क नसणाऱ्या चौघांकडून एक हजार ६०० रुपये दंड ठोठावण्यात आला. २ वाहने पोलिसांनी जप्त केली, तर १० कारचालकांवर मोटार वाहतूक कायद्यांतर्गत नाकाबंदी दरम्यान कारवाई केली.
------------------------------------
सकाळी ११ ते ७ जीवनावश्यक वस्तुंची दुकाने खुली रहातील. या वेळेत कोविड-१९ नियमांचे पालन करून खरेदी करा. त्यानंतर घरातच रहा. कारवाईची वेळ आणू नका. प्रशासन कुणाचीही गय करणार नाही.
-विजय लोहकरे, मुख्याधिकारी, न.प.मूर्तिजापूर.
----------------------------------------------------------------
नागरिकांनी कामाशिवाय फिरू नये. चौकाचौकात तपासणी होत आहे. पोलीस प्रशासन नियम मोडणाऱ्यांविरूद्ध कठोर कारवाई करेल. स्वतः सुरक्षित रहा, इतरांनाही सुरक्षित ठेवा.
-आशीष शिंदे. पोलीस उपनिरिक्षक, मूर्तिजापूर.

संपादन - विवेक मेतकर