खतांचा वारेमाप वापर देतोय किडींना निमंत्रण अन् खिशाला चटका

Uria.jpg
Uria.jpg

अकोला : जिल्ह्यात गेल्या पाच वर्षातील खरीप पेरणी क्षेत्राचा आढावा घेतल्यास सरासरी चार लाख १८ हजार हेक्टरवर पेरणी केली जात असल्याचे दिसून येते. यंदाही जवळपास तेवढ्याच क्षेत्रावर पेरणी झाली आहे. असे असले तरी, युरियासह इतर खतांचा वापर मात्र दरवर्षी वाढत असून, त्यामुळे उत्पादन खर्चात वाढ होत आहे. शिवाय जमिनीचा कस घटत असून, खताच्या अती वापरामुळे पीके हिरवेगार होत असल्याने रस शोषण करणाऱ्या कीडींनाही निमंत्रण मिळत आहे.


राज्यातील कृषी विद्यापीठे व कृषी तज्ज्ञांच्या शिफारशीनुसार मूग, उडीद, तूर व सोयाबीन या पिकांच्या मुळांवर गाठी असतात. या गाठींद्वारे ही पिके हवेतील नत्र शोषून घेतात. त्यामुळे त्यांना नत्र खते देण्याची आवश्‍यकता भासत नाही. कपाशी पिकालाही आवश्‍यकतेप्रमाणेच युरिया देण्याची शिफारस करण्यात आली आहे. परंतु, युरिया दिल्यामुळे पिके जोमदार होतात, फुलधारणा अधिक होते व उत्पादन वाढते असा बहुतांश शेतकऱ्यांचा समज असल्याने जिल्ह्यात कपाशीसह सोयाबीन, तूर, मूग, उडीद पिकांना अनावश्‍यक युरिया खत देण्यात येत असल्याचे कृषी तज्ज्ञांचे मत आहे. मात्र, युरियाच्या अनावश्‍यक वापरामुळे जमिनीचा कस घटत असून, उत्पादन खर्चात वाढ होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी युरियासह इतरही खतांचा अतिरिक्त वापर टाळावा, असा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला आहे.

...म्हणून किडींचा प्रादूर्भाव अन् उत्पादन खर्चही वाढतो
तूर, मूग, उडीद व सोयाबीन पिकांना गरज नसतानाही युरिया खत दिले जाते तसेच कपाशीलाही आवश्‍यकतेपेक्षा अधिक युरिया दिला जातो. त्यामुळे या पिकांची पाने हिरवेगार व लुसलुसीत होतात आणि अशा पिकांवर रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. या कीडीला आटोक्यात आणण्यासाठी शेतकऱ्यांना कीडनाशकांच्या फवारण्याही जास्त काढाव्या लागतात. यामुळे जिल्ह्यात उत्पादन खर्चातही दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे चित्र आहे.

असा वाढला खतांचा वापर
सरासरीनुसार जिल्ह्यात दरवर्षी खरिपासाठी सप्टेंबर अखेरपर्यंत जवळपास ६२ हजार मेट्रीक टन खतांचा वापर करण्यात आला आहे. यावर्षी मात्र ऑगस्टच्या सुरुवातीलाच ६० हजार ५२१ मेट्रीक टन खताचा पुरवठा झाला असून, शेतकरी युरियाची मागणी करीत आहेत. त्यानुसार जिल्ह्यात युरियासह इतर खतांचा वापर वाढल्याचे चित्र असून, सध्या जिल्ह्यामध्ये युरिया व्यतिरिक्त इतर खतांचा मुबलक साठा उपलब्ध असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे.

युरियाचा अतिवापर म्हणजे उत्पादन खर्चात वाढ
सोयाबीन, तूर, मूग, उडिदाला युरिया देण्याची आवश्‍यकता नाही. कपाशीला सुद्धा आवश्‍यकतेपेक्षा जास्त युरिया दिला तर पिकाची कायीक वाढ जास्त होऊन सदर पीक लुसलुसीत होतो. अशा पिकावर रस शोषण होणाऱ्या कीडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता अधिक असते आणि कीडींना आटोक्यात आणण्यासाठी आंतरप्रवाही कीटकनाशकांचा फवारा करावा लागतो व त्यातून उत्पादन खर्च वाढतो. युरिया देण्याची गरज फक्त कपाशी पिकाला असून, ती अमोनियम सल्फेट या खतामधून सुद्धा भागविता येते. अमोनियम सल्फेटमध्ये नत्रासोबतच सल्फर सुद्धा असते जे की, पिकाची गुणवत्ता वाढविण्यासाठी लाभदायक ठरते.
- मुरलीधर इंगळे, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, अकोला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com