
वैतागलेल्या शेतकऱ्याने दोन एकर कांद्याच्या पिकात सोडला मेंढ्याचा कळप!
वाडेगाव - रब्बी हंगामातील कांदा लागवड दरम्यान झालेल्या निसर्गाच्या अवकृपेमुळे कांदा उत्पादनात मोठ्या प्रमाणात होत असलेली घट, तसेच बाजारपेठेत गडगडलेली भाववारीमुळे वैतागलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्याने दोन एकर कांदा पिकात गुरे चारून आपला राग व्यक्त केला. पातूर कृषी विभाग अंतर्गत येत असलेल्या पातूर तालुक्यातील सस्ती येथील शेतकऱ्याने यांनी दोन एकर शेतात लावलेल्या कांदा पिकात मेंढ्या सोडल्याची घटना सोमवारी (ता.१८) घडली. अनिल कीर्तने यांनी खरिपाची कसर भरून काढण्यासाठी गत वर्षी महागडे कांदा रोप खरेदी करून दोन एकर शेतात कांदा लागवड केली होती.
जानेवारीतर वातावरणातील बदलामुळे मोठ्या प्रमाणात धुके पडले होते, परिणामी लागवड करण्यात आलेल्या कांदा रोपे जागीच जळाल्याने कीर्तने चिंताग्रस्त होते. निदान लागवडीला लागलेला खर्च निघावा अशी, त्यांची इच्छा होती. परंतु, निसर्गाला काही औरच मान्य होते. वजनात आणि आकाराने लहान असलेल्या कांद्याचे भाव बाजारात कोसळ्याने शेतकरी अधिकच आर्थिक संकटात सापडला. एवढे करूनही हाती शून्य मिळत असल्याचे पाहून वैतागलेल्या शेतकऱ्याने तब्बल दोन एकर कांद्याच्या पिकात चक्क मेंढराचा कळप चारण्यासाठी सोडून संपूर्ण कांदा पीक जमीनदोस्त केले. परीसरात रब्बी हंगामात कांदा पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते आणि बहुतांश कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे खरीप हंगामातील शेती व पिकांचे नियोजन कांदा पिकाच्या उत्पादनावर अवलंबून असते, त्यामुळे आर्थिक दृष्ट्या नुकसान झालेल्या शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत सापडला आहे.
Web Title: Flock Of Sheep Left In Two Acer Onion Crop
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..