अकोला - विदर्भाच्या मातीतला एक कणखर नेता, शिक्षण क्षेत्राचा निष्ठावान सेवक, आणि सामाजिक बांधिलकी जपणारा एक हळवा कार्यकर्ता काळाच्या पडद्याआड गेला. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार प्रा. तुकाराम बिडकर यांचे गुरुवारी अपघातात निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण विदर्भात शोककळा पसरली आहे.
शिवणी विमानतळावरून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतल्यानंतर, तुकाराम बिडकर हे शिक्षक राजदत्त मानकर यांच्या दुचाकीवरून घरी परतत होते. शिवणी येथील टि-पॉईंटजवळ एका भरधाव पिकअपने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली.
या भीषण अपघातात बिडकर आणि मानकर दोघेही गंभीर जखमी झाले. नागरिकांनी त्यांना तातडीने अकोल्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचार सुरू असतानाच दोघांचेही प्राण ज्योती मालवली.
‘माळी समाजाचा आधारवड हरपला’
तुकाराम बिडकर हे केवळ एक राजकीय नेते नव्हते, तर ते माळी समाजाच्या उत्थानासाठी झटणारे एक लोकनेते होते. २००४ ते २००९ या काळात मुर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून त्यांनी भरीव कार्य केले.
विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी अनेक महत्त्वाचे प्रकल्प राबवले. आमदार होण्यापूर्वी ते अकोला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. त्यांच्या दूरदृष्टीमुळे आणि धडाडीच्या स्वभावामुळे अनेकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक तरुण पुढे आले, अनेकांना शिक्षणाची संधी मिळाली.
राजकीय, क्रीडा आणि शिक्षण क्षेत्रावर दुःखाचे सावट
तुकारामभाऊंच्या जाण्याने केवळ राजकीय वर्तुळातच नव्हे, तर क्रीडा आणि शिक्षण क्षेत्रातही मोठी पोकळी निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांना नेहमी मदतीचा हात देणारा हा शिलेदार, खेळाडूंना संधी मिळावी यासाठी झटणारा हा धडाडीचा नेता आता आपल्यात नाही. अनेक राजकीय नेत्यांनी, समाजसेवकांनी आणि शिक्षकांनी त्यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले आहे.
‘आपलेपणाने बांधलेली माणसं आज पोरकी झाली’
बिडकर यांनी केवळ राजकारण नव्हे, तर समाजकारणही तितक्याच तळमळीने केले. आपल्या सहज आणि मनमिळावू स्वभावाने त्यांनी हजारो लोक जोडले. त्यांच्या जाण्याने विदर्भाने एक निस्वार्थी नेता गमावला आहे. त्यांच्या आठवणी कायमस्वरूपी जिवंत राहतील, पण त्यांच्या अचानक जाण्याने झालेली हानी भरून न निघणारी आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.