esakal | प्लॉट खरेदी-विक्रीच्या व्यवहारात डॉक्टरची २५ लाखाने फसवणूक
sakal

बोलून बातमी शोधा

plot.png

प्लॉट खरेदी-विक्रीच्या व्यवहारात डॉक्टरची २५ लाखाने फसवणूक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बाळापूर ः तालुक्यातील वाडेगाव येथील रहिवाशी गोपाल चंद्रभान हाडोळे याने अकोला येथील डॉ. संदीप साहेबराव अरसड यांची २५ लाख रूपयांनी फसवणूक केल्याप्रकरणी शेगांव पोलिस स्टेशनमध्ये गोपाल हाडोळेवर भादंवि १८६० च्या कलम ४२० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी हाडोळे याला न्यायालयाने तात्पुरता जामीन मंजूर केला असल्याची माहिती शेगाव पोलिसांनी दिली आहे. Fraud of Rs 25 lakh for doctor in plot purchase and sale transaction

११ एप्रिल २०१८ रोजी गोपाल हाडोळे याने बाळापूर रोड, शेगाव या ठिकाणचे १५ प्लॉट विकण्यासाठी डॉ. संदीप अरसड यांच्यासोबत २५ लाख रुपये घेवून इसार केला होता. १२० दिवसात खरेदी करून देण्याचे इसार पावतीत नमूद केले होते. वास्तविक पाहता हे सर्व प्लॉट ॲक्सीस बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, खामगाव अर्बन बँक, पुसद अर्बन बँक व इतर बँकांमध्ये गहाण होते. १५ पैकी ९ प्लॉटची २५ मार्च २०१९ रोजी ४८ लाख ५२ हजार ८७५ रुपये डॉ. संदीप अरसड यांच्याकडून चेकद्वारे घेवून खरेदी करून दिली. परंतु खरेदी करून देताना याआधी इसार पावतीत नमूद केलेल्या २५ लाख रूपयांचा कोणताही उल्लेख खरेदीत केला नाही व ही रक्कम परतही केली नाही.

डॉ. संदीप अरसड यांनी उर्वरित ६ प्लॉटची खरेदी त्वरीत करून द्यावी किंवा याआधी घेतलेले २५ लाख रुपये परत द्यावे अशी मागणी केली. त्यावर गोपाल हाडोळे याने ३० सप्टेंबर २०१९ रोजी १० लक्ष व १५ लक्ष रुपयांचे दोन चेक डॉ. संदीप अरसड यांना दिले. मात्र हे दोन्ही चेक अनादरित (बाउन्स) झाले. डॉ. अरसड यांनी वारंवार पैसे परत करण्याची मागणी केल्यावरही गोपाल हाडोळे याने पैसे परत केले नाही. त्यामुळे डॉ. संदीप अरसड यांनी शेगाव पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केल्यानंतर गोपाल हाडोळेवर गुन्हा दाखल केला.

हेही वाचा: खोटे कागदपत्रे तयार करुन जमिन हडपली!

गोपाल हाडोळेचा इतिहास फसवणुकीचा
गोपाल हाडोळे याच्याविरूद्ध गत ४ वर्षांपासून जिल्हा सत्र न्यायालयात चेक बाऊंसच्या एकूण २९ केसेस सुरू आहेत. याशिवाय फरिदाबाद बहादूरजंग व अहमदाबाद येथेही अनेक केसेस सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. अकोल्यातील ॲक्सीस बँकेचीही गोपाल हाडोळे याने चार कोटी तेवीस लाख रुपयांची रक्कम व मास फायनांन्शीयल सर्विसेसची ८० लाख रुपयांची रक्कम थकविली आहे.

या प्रकरणी दोन दिवसांपूर्वी शेगांव पोलिसात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र आरोपीला न्यायालयाने तात्पुरता जामीन मंजूर केला आहे. त्याचा जामिन रद्द होणार की कायम ठेवली जाणार हे २२ जून रोजी न्यायालयाकडून समजणार आहे.
- संतोष टाले
पोलिस निरीक्षक, शेगाव पोलीस ठाणे

संपादन - विवेक मेतकर

Fraud of Rs 25 lakh for doctor in plot purchase and sale transaction

loading image