esakal | गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांचा मुक्त संचार!
sakal

बोलून बातमी शोधा

गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांचा मुक्त संचार!

गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांचा मुक्त संचार!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

शिरपूर जैन (जि.वाशीम) ः येथे कोरोचा आलेख वाढला असून, रविवारी (ता.२५) आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार ९२ रुग्ण पॉझिटिव्ह असल्याची माहिती आहे. शिरपूर येथे काही ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण हे गृह विलगीकरणमध्ये आहेत, मात्र त्यांचा गावामध्ये मुक्त संचार होत असल्याने कोरोनाचा फैलाव होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

संपूर्ण जिल्ह्यामध्ये सध्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आलेख वाढला आहे. त्यामुळे सर्वांची चिंता वाढली आहे. शिरपूर येथे रविवारी (ता.२५) एकूण ९२ पॉझिटिव्ह रुग्ण असल्याची माहिती आहे. दररोज यामध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र आहे. नागरिकांनी लॉकडाउनचे काटेकोर पालन करणे गरजेचे झाले आहे,

मात्र दुपारच्या वेळी बस स्थानक परिसरात अनेक नागरिक गप्पा मारत बसलेले आढळतात. काम नसतानाही काही नागरिक घराबाहेर पडत आहेत. ही निश्चितच चिंतेची बाब म्हणावी लागेल. शिरपूर येथे आजपर्यंत पाच नागरिकांचा मृत्यू झाला आहे. याचे गांभीर्य नागरिकांनी ओळखावे अन्यथा गंभीर परिस्थिती निर्माण होण्यास वेळ लागणार नाही.

येथील गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांनी गावामध्ये मुक्त संचार न करता घरामध्येच राहावे व कोरोनाचा फैलाव होणार नाही याची पूर्ण दक्षता घ्यावी अन्यथा कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने देण्यात आला.

---------------------------------

पोलिस प्रशासनाच्या वतीने कारवाई

रविवारी (ता.२५) अत्यावश्यक सेवा भाजीपाला, फळांची दुकाने अकरा वाजल्यानंतर चालू असल्याचे निदर्शनास आल्याने पोलिस निरीक्षक सुनील वानखडे यांनी काही नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. अकरा वाजताच्यानंतर कुणीही आवश्यक कामाशिवाय बाहेर पडू नये, अत्यावश्यक सेवामध्ये येणारे किराणा दुकान, भाजीपाला विक्रेते, फळ विक्रेते नियमांचे काटेकोर पालन करावे अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिस विभागाकडून देण्यात आला आहे.

संपादन - विवेक मेतकर

loading image