गॅस सिलेंडरचा स्फोट, एक ठार तीन गंभीर | Akola | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अकोला : गॅस सिलेंडरचा स्फोट, एक ठार तीन गंभीर

अकोला : गॅस सिलेंडरचा स्फोट, एक ठार तीन गंभीर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रिसोड : येथील सराफालाइन मधील बिछायत केंद्राच्या गोदामाला आग लागून सिलेंडरचा स्फोट होऊन एक ठार व तीन युवक जखमी झाल्याची घटना २१ नोव्हेंबरच्या रात्री १०.३० वाजता घडली. स्फोटाने अर्धे शहर हादरले. आशिष इंद्रजीत राऊत असे घटनास्थळी मृत झालेल्या युवकाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, येथील सराफालाइनमध्ये विठ्ठल शिवराम काटोले यांच्या जागेमध्ये श्रीराम बगडिया यांचे बिछायत केंद्राचे गोदाम आहे. या गोदामामध्ये बिछायत केंद्राच्या इतर साहित्यासह दोन सिलेंडर होते. २१ नोव्हेंबरच्या रात्री १०.३० वाजता गोदामातील साहित्याला आग लागली. सुरुवातीला धूर मोठ्या प्रमाणात येत असल्यामुळे गल्लीतील काही तरुण आग विजवण्यासाठी तसेच मालक श्रीराम बागडिया यांना सांगण्यासाठी गोदामाच्या समोर गोळा झाले. परंतु, आतमध्ये आगीने रुद्ररूप धारण केले होते. मालक बगडिया हे गोदामाची चाबी आणण्यासाठी जवळच असलेल्या घरी गेले. गल्लीतील इतर तरुण मुलांसह विठ्ठल अशोक गुगळे १८, काना सुनील तापडिया २५, सागर सुनिल तापडिया २९ व आशिष इंद्रजीत राऊत १७ हे गोदामाच्या दरवाज्याजवळ उभे होते. एवढ्यात सिलेंडरचा स्फोट झाला व हे चारही तरुण आगीच्या ज्वालासह दूरवर फेकले गेले.

हेही वाचा: उस्मानाबाद : शंभर टक्के लसीकरणाच्या गावांचे शतक

दरवाजा व भिंत स्फोटाने तुटल्यामुळे चौघांनाही जबरदस्त मार लागला. स्फोट एवढा भीषण होता की, अर्धे शहर हादरले व या ठिकाणी एकच गर्दी झाली. सर्व जखमींना खाजगी रुग्णालयात व नंतर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. आशिष इंद्रजीत राऊत याला डॉक्टरांनी मृत घोषित केले व इतर तीन युवकांना प्रथम वाशीम आणि तेथून अकोला येथे हलविण्यात आले. यातील सागर तापडिया यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे कळते. अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणली परंतु, गोदामातील साहित्य व संपूर्ण घर जळून खाक झाले. ठाणेदार व तहसीलदार अजित शेलार घटनास्थळी दाखल झाले होते. पुढील तपास पोलिस करत आहेत.

...तर अनर्थ टळला असता

बिछायत केंद्राच्या गोदामाला आग लागल्यानंतर आगीचे रौद्ररूप पाहिल्यानंतर श्रीराम बगडिया यांनी आत सिलेंडर आहेत, असे सांगितले असते तर, हा अनर्थ टळला असता.

चौकाचौकात बारूदाची कोठारे

या बिछायत केंद्रामध्ये ज्या पद्धतीने सिलेंडर ठेवले होते, ती बाब अतिशय बेफिकीर वृतीची आहे. मात्र, शहरात चौकाचौकात हातगाड्या, चहाच्या टपऱ्यांमधे उघड घरगुती सिलेंडर वापरले जातात. सायंकाळी दुकान बंद झाल्यानंतर ही सिलेंडर खोक्यात तशीच ठेवली जातात. खाऊगल्ली तर बारूदाच्या ढिगाऱ्यावर बसल्यागत धोकादायक झाली आहे.

loading image
go to top