शंभर टक्के लसीकरणाच्या गावांचे शतक | Osmanabad | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लसीकरण
लसीकरणाच्या गावांचे शतक

उस्मानाबाद : शंभर टक्के लसीकरणाच्या गावांचे शतक

उस्मानाबाद : कोरोना संसर्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी राबविल्या जात असलेल्या मोहिमेत शंभर टक्के लसीकरण झालेल्या गावांनी शतक गाठले. त्यामुळे ग्रामीण भागात लसीकरणासाठी नागरिकांचा प्रतिसाद मिळत असल्याचे यातून दिसून येत आहे. जिल्ह्यातील १०२ गावातील सर्व ग्रामस्थांनी लस घेतली आहे. कोरोना संसर्गाने जिल्ह्यासह जगभरात मोठी जीवित हानी झाली होती. त्यानंतर लसीकरणाचा मुद्दा समोर येत होता. केंद्र शासन स्तरावरून याबाबत मोफत लसीकरणाची मोहीम राबविण्यात आली. गेली अनेक महिन्यांपासून जिल्ह्यासह संपूर्ण देशात लसीकरण केले जात आहे.

हेही वाचा: रत्नागिरी : आभासी वाहन चालवण्याची यंत्रणा आता प्रत्येक आरटीओत!

जिल्ह्यात सध्या तब्बल १०२ गावांमध्ये १०० टक्के लसीकरण झाले आहे. यामध्ये रोज वाढ होत आहे. उस्मानाबाद तालुक्यात नऊ, तुळजापूर दोन, उमरगा ३१, लोहारा दोन, कळंब १९, वाशी आठ, भूम २० तर परंडा तालुक्यातील ११ अशा एकूण १०२ गावांचे १०० टक्के लसीकरण झाले आहे. या गावात दोन्ही डोस देण्यात आले आहेत. जिल्हा आरोग्य प्रशासनाकडून लसीकरण करण्यासाठी विविध प्रकारे प्रयत्न केले जात आहेत. सकाळी नऊ वाजल्यापासून सायंकाळी पाचपर्यंत लसीकरण करण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र, काही गावांतून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने १०० लसीकरणात अडथळे येत आहेत. संबंधित गावांनी सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. जगातील काही प्रगत देशांमध्ये सध्या कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. अशा परिस्थितीत १०० टक्के लसीकरण करणे गरजेचे आहे. नागरिकांनी स्वतः पुढे येऊन लसीकरणास प्रतिसाद देण्याची गरज आहे. शिवाय गावातील पुढाऱ्यांनी यासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा आरोग्य विभागाकडून केली जात आहे.

सर्वप्रथम लसीकरण झालेली गावे प्रत्येक तालुक्यातून एका गावाने लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. उपळा (ता. उस्मानाबाद), सावंतवाडी (ता. तुळजापूर), व्हंताळ (उमरगा), आरणी (लोहारा), दहिफळ (कळंब), फाकराबाद (वाशी), बागलवाडी (भूम) तर परंडा तालुक्यात वानेवाडी गावांनी तालुक्यातून प्रथम १०० टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे.

"लसीकरण ही काळाची गरज आहे. आरोग्य विभागाची यंत्रणा यासाठी मोठी मेहनत घेत आहे. त्यास नागरिकांनी प्रतिसाद द्यावा. जिल्ह्यात लसीकरण झालेली १०२ गावे आहेत. तीन दिवसांपूर्वीची ही संख्या असून यामध्ये रोज वाढ होत आहे. दोन दिवसात पुढचा अहवाल येईल. यामध्ये गावांची संख्या वाढलेली असेल."

- डॉ. कुलदीप मिटकरी, वैद्यकीय अधिकारी, जिल्हा परिषद, उस्मानाबाद.

loading image
go to top