मुलगी फितूर, DNA अहवाल ठरला महत्त्वाचा पुरावा; जन्मदात्या बापाला जन्मठेप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

life-imprisonment-

मुलगी फितूर, DNA अहवाल ठरला महत्त्वाचा पुरावा; जन्मदात्या बापाला जन्मठेप

अकोला : एमआयीडीसी पोलिस स्टेशन परिसरातील एका बापानेच स्वतःच्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार करून तिला गर्भवती केल्याची घटना नोव्हेंबर २०१९ मध्ये घडली होती. याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने क्रुरकर्मा नराधम बापाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून, एका लाख ८५ हजार रुपये दंडही ठोठावला आहे.

शहरातील एमआयडीसी पोलिस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीनुसार एका १५ वर्षी मुलीच्या स्वत:च्या बापानेच वारंवार लैंगिक शोषण केल्याने मुलगी गर्भवती झाली. मुलीची प्रकृती खालावल्याने तिला सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले असता ही बाब उघडकीस आली. डॉक्टरांनी याची माहिती बाल कल्याण समिती आणि पोलिसांनी दिली. त्यानंतर पीडितेच्या जबाबानुसार एमआयडीसी पोलिस स्टेशनला वडिलांविरोधात गुन्हा दाखल करून नराधमाला अटक करण्यात आली.

पोलिसांनी तपास करून प्रकरण न्यायप्रविष्ट केले. विद्यमान अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश (विशेष न्यायालय) पिंपरकर यांच्या न्यायालयात झालेल्या सुनवण्यात नराधम बापाला ३७६ (२) (एफ) (एन) व पॉक्सो कायदा कलम ३-४, ५ (एल) (एन) मध्ये दोषी ठरवून आजन्म कारावास, कलम ३७६ (सी) मध्ये १० वर्षे सश्रम कारावास आणि एक लाख ८५ हजार रुपये दंड ठोठवला आहे. दंड न भरल्यास प्रत्येक कलमामध्ये अतिरिक्त सहा महिन्यांची शिक्षा नराधमाला भोगावी लागणार आहे. सरकारतर्फे सहायक सरकारी वकील मंगला पांडे आणि किरण खोत यांनी बाजू मांडली. एलपीसी अनुराधा महल्ले व सीएमएसचे प्रवीण पाटील यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले.

सरकार पक्षातर्फे २१ साक्षीदार तपासले

अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश पिंपरकर यांच्या न्यायालयात या प्रकरणात पीडित मुलगी, तिच्या आईचा जबाब, वैद्यकीय पुरावे, डीएनआयच्या वैद्यकीय अहवालासह सरकारतर्फे एकूण २१ साक्षीदार तपासण्यात आले होते.

पीडिता व आई फितूर तरीही शिक्षा

नराधम बापाच्या अत्याचारानंतरही पीडित बालिका व तिची आई सुनावणीदरम्यान फितूर झाली. मात्र त्यांची पूर्वी दिलेली बायाने, वैद्यकीय पुरावा व डीएनए अहवालाच्या आधारावर नराधम बापास त्याने केलेल्या कृत्याबद्दल दोषी ठरवून न्यायालयाने जन्मठेपेचे शिक्षा सुनावली.