जीएमसीत ऑक्सिजनचा तुटवडा!

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 13 June 2020

कोरोना रुग्णांचे हालः दिवसाला लागतात 300 सिलिंडर; आवश्‍यक ऑक्सिजनची मागणी

अकोला  ः कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध पातळीवर प्रशासनाची तयारी सुरू असताना रुग्णांच्या उपचारात कमी पडू नये, याची खबरदारीही घेतली जात आहे. कोरोनाच्या रुग्णांसाठी ऑक्सिजनचा पुरवठा हा कळीचा मुद्दा आहे. पण, येथील सर्वोपचार रुग्णालयात सध्या ऑक्सिजनचा तुटवडा असल्याचे भयाण वास्तव आहे. सध्या जीएमसीकडे ऑक्सिजनचे दोनशे कोट उपलब्ध असून, दिवसाला 300 सिलिंडर लागत आहेत. तर वाढत्या रुग्णसंख्येसमोर असलेला ऑक्सिजनचा साठा कमी पडत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

वैद्यकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाचा लढा देण्यासाठी अगोदर पीपीई कीटबाबत चर्चा होती. आता या कीटही मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्या आहे. रुग्ण संख्या वाढल्यास ऑक्सिजन पुरवठ्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो याची भीती जीएमसी प्रशासनाला होतीच. आता तीच वेळ आली असून, दिवसाला रुग्णसंख्या वाढत आहे. सोबतच मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. यामागील कारणांचा शोध घेतला असता सर्वोपचार प्रशासनाकडे व्हेंटीलेटरची असलेली कमतरता आणि सोबतच आता ऑक्सिजनचाही साठा तुटपुंजा असल्याचे दिसून आले. हीबाब अकोलेकरांसाठी चिंता करणारी अशीच आहे.

तिनशे सिलिंडर अपुरे
गंभीर रुग्णाला श्वास घेता येत नसेल तर ऑक्सिजनचा उपयोग व्हेंटिलेटरमार्फत केला जातो. तर इतर रुग्णांना व्हेंटिलेटरशिवाय सुद्धा केला जातो. एक पेशंटला साधारण एक सिलिंडर २४ तास ऑक्सिजन पुरवू शकतो. रुग्णांची संख्या वाढली तर ऑक्सिजनचे प्रमाणही वाढणार असल्याने ३०० सिलिंडर अपुरे पडणार आहे. त्यामुळे ही संख्या वाढवावी लागणार आहे.

आवश्यक औषध यादीत समावेश
कोरोनाचा रुग्णांवर उपचार करताना मेडिकल ऑक्सिजनची कमतरता पडू नये यासाठी यापूर्वीच केंद्र सरकारने सूचना सर्व राज्यांना दिलेल्या आहेत. त्यात मेडिकल ऑक्सिजनचा समावेश राष्ट्रीय व डब्ल्यूएचओच्या यादीत आवश्यक औषध म्हणून समावेश केला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले निवेदन
ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे रुग्णांचा मृत्यू होत असल्याची स्थिती आहे. त्यावर जन सत्याग्रह संघटनेने जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे. देण्यात आलेल्या निवेदनात नमुद आहे की, आधीच कोरोनामुळे खूप विचलित झाला आहे, रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मृत्यूची संख्याही 44 पेक्षा जास्त झाली आहे. रूग्णांना ऑक्सिजन मिळालेला नाही की, बहुतेकदा रुग्णांना श्वासोच्छवासाची तक्रार असते आणि आजारपण हा आजार आपल्या समाजात सामान्य झाला आहे. वेळेवर ऑक्सिजन न मिळाल्यास श्वास घ्यायला त्रास होणारे असे बरेच रुग्ण आहेत. तेव्हा लोकांचे व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनची संख्या वाढवावी अन्यथा जन सत्याग्रह संघटना जनआंदोलन करेल, असा इशारा दिला आहे. असिफ अहमद खान यांच्या नेतृत्वात ही विनंती करण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: GMC oxygen shortage!