Soybean Conferance | ‘सरकारबरोबर विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या तोंडाला पुसली पाने’; राजु शेट्टी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MP Raju Shetty

‘सरकारबरोबर विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या तोंडाला पुसली पाने’; राजु शेट्टी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रिसोड (जि. बुलडाणा) - केंद्र व राज्य शासनासह विमा कंपनीनेही शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, असा घणाघाती आरोप राजु शेट्टी यांनी वाकद येथील आयोजित सोयाबीन परिषदेत केला. वाकद येथे शेतकऱ्यांच्या न्यायासाठी सोयाबीन परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंचावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष खासदार राजु शेट्टी, रविकांत तुपकर, दामू अण्णा इंगोले, पवन देशमुख, बालाजी मोरे उपस्थित होते. सोयाबीन परिषदेचे आयोजन दामू इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली पैठणकर व भिकन यांनी केले होते.

पुढे बोलताना राजु शेट्टी म्हणाले, केंद्र शासनाने सोया पेंड आयात करून तसेच पाम तेलावरील निर्बंध उठवून सोयाबीनचे भाव निम्म्यापेक्षाही कमी केले. अतिवृष्टी झाल्यामुळे सोयाबीनची नासाडी झाली, तरीही विमा कंपनीने शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत विमा भरपाई दिलेली नाही. राज्य शासनाचे विमा कंपन्यांना अभय आहे. केंद्र शासन, राज्य शासन व विमा कंपनीनेही शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. ऐन रब्बी हंगामात वीज कनेक्शन तोडल्या जात आहेत. काही ठिकाणी सक्तीची वसुली केली जात आहे.

हेही वाचा: आघाडीचे सरकार अलिबाबा, चाळीस चोरांचे; ४० चोरांचे पितळ उघडे करणार

शेतकऱ्यांना कोंडीत पकडून अडचणी वाढविल्या जात आहेत. वज्रमूठ करून एकत्र घेऊन शासनाला धडा शिकवण्याची वेळ आली आहे. केंद्र शासन हे व्यापारी धार्जिणे आहे. सोया पेंड आयात करून व तिला वरील निर्बंध कमी करून अकरा हजाराच्यावर गेलेले सोयाबीनचे भाव शासनाच्या नाकर्ते धोरणामुळे चार ते पाच हजारापर्यंत खाली आले आहेत. सोयाबीनला कमीत कमी आठ हजार रुपये भाव द्यावा.

संपूर्ण वाशीम जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करून हेक्‍टरी ५० हजार रुपये मदत द्यावी. कृषिपंपाचे वीजबिल माफ करावे. नवीन वीज जोडणी त्वरित करावी. कर्जमाफी पात्र असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी. विमा कंपन्यांनी त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात विमा जमा करावा. प्रमुख न्याय मागण्यासाठी ते आक्रमक होऊन बोलत होते.

शासनाने या प्रमुख मागण्याची दखल न घेतल्यास १७ नोव्हेंबरपासून टप्प्याटप्प्याने आंदोलनाचा वणवा भेटणार असल्याचे राजु शेट्टी यांनी सांगितले. यावेळी रविकांत तुपकर व दामू अण्णा इंगोले यांनीही शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्या व हक्कासाठी रस्त्यावर उतरून शेवटपर्यंत लढणार, असे भाषणात सांगितले. कार्यक्रमाला तालुक्यातील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या शेवटी वज्रमूठ करून शपथ घेण्यात आली.

loading image
go to top