गावातील आरोग्य यंत्रणाच पडली आजारी; आगर येथील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात, जि.प. आरोग्य विभागाचे दुर्लक्ष

श्रीकृष्ण फुकट 
Sunday, 24 January 2021

जिल्ह्यातील बहुसंख्य गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी यांची अनुपस्थिती असल्यामुळे ग्रामीण आरोग्य व्यवस्था वाऱ्यावर सापडली आहे. या गंभीर बाबीकडे जिल्हा परिषद विभागाचे दुर्लक्ष असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

आगर (अकोला) : पाच हजार लोकवस्ती असणाऱ्या ग्राम आगर येथे गेल्या अनेक वर्षापासून गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी सुसज्ज अशी आरोग्य केंद्र इमारत कार्यरत असून, या आरोग्य केंद्रात एकूण १४ ते १५ कर्मचारी कार्यरत आहेत. परंतु, ही आरोग्य यंत्रणा जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्याऐवजी स्वतः आजारी पडल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे तुम्ही आजारी नागरिकांचे काळजी घेणार आहात की, आम्हाला तुमची काळजी घ्यावी लागणार? असा प्रश्‍न आगर सह परिसरातील नागरिकांना पडला आहे.

अकोल्याच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा 

तीस हजार लोकसंख्या असणाऱ्या गावासाठी स्वतंत्र आरोग्य यंत्रणा तसेच, उपकेंद्र अशी जनतेच्या सेवेसाठी आरोग्य यंत्रणा कार्यरत आहे. परंतु, जिल्ह्यातील बहुसंख्य गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी यांची अनुपस्थिती असल्यामुळे ग्रामीण आरोग्य व्यवस्था वाऱ्यावर सापडली आहे. या गंभीर बाबीकडे जिल्हा परिषद विभागाचे दुर्लक्ष असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

हे ही वाचा : कोरोना विरुद्धच्या लढाईत एक लाख चाचण्या

आगर सह जिल्ह्यातील सर्वच आरोग्य केंद्र व वैद्यकीय अधिकारी तसेच इतर कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र निवासाची व्यवस्था केली असून, त्यांना दरमहा निवासासाठी खर्च केली जाणारी रक्कम सुद्धा त्यांच्या पगारात दिली जाते. परंतु, वैद्यकीय अधिकारी निवासात नावापुरतेच राहत असून रात्री-अपरात्री रुग्णांना काही त्रास झाला, तेव्हा वैद्यकीय अधिकारी यांचे निवास रिकाम्या अवस्थेत दिसून येत असल्यामुळे रुग्णांना खासगी दवाखान्यात उपचार घ्यावे लागत आहे. या गंभीर बाबीकडे संबंधित जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे दुर्लक्ष असल्यामुळे हा प्रकार घडत असल्याचा आरोप ग्रामीण जनतेने केला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

येथील आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र निवासाची व्यवस्था असून, सुद्धा वैद्यकीय अधिकारी या निवास स्थानात हजर राहत नसल्यामुळे आरोग्य केंद्राची इमारत केवळ शोभेची वस्तू असल्याचे दिसून येत आहे. शासनाकडून लाख रुपये पगार घेणारे कर्मचारी केवळ स्वतःच्या घरी राहूनच आपला कारभार पाहत असल्यामुळे ग्रामीण जनतेच्या आरोग्याचा खेळ करत असल्याचे निदर्शनास आले आहे. जनतेच्या आरोग्याची काळजी घेणारे प्राथमिक आरोग्य केंद्र स्वतः आजारी पडत असल्याचे चित्र यावरून दिसून येत आहे.

हजर न राहणाऱ्या कर्मचाऱ्यावर कारवाईचा आदेश

ग्रामीण विभागातील बहुसंख्य आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी तसेच आरोग्य कर्मचारी उपस्थित राहत नसल्यामुळे आरोग्य यंत्रणा आजारी असल्याचे चित्र दिसून आले आहे. त्यामुळे जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत निवासी कर्मचारी उपस्थित राहत नसल्यामुळे त्यांच्यावर तत्काळ निलंबनाची कारवाई करावी असे, लेखी आदेश जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या समक्ष काढण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषद आरोग्य सभापती सावित्रीबाई राठोड यांनी दिले आहेत.

आरोग्य केंद्रातील बहुसंख्य कर्मचारी आगर-अकोला अपडाऊन करत असल्यामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा परिणाम झाल्यामुळे ग्रामीण जनतेला शासनाच्या आरोग्य केंद्रात उपलब्ध सुविधा मिळत नसल्याने, खासगी दवाखान्यात उपचारासाठी जावे लागत आहे. या संदर्भात अनेक वेळा जिल्हा परिषद अध्यक्षाकडे मुख्यालयी हजर न राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशा सूचना दिल्या आहेत. परंतु, त्याकडे जिल्हा प्रशासनाच्या वतीने कुठल्या प्रकारची कारवाई केली जात नसल्याचे निर्देशन आले.
-वेणूताई डाबेराव, जि.प.सदस्य.

येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एकूण दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे कार्यरत आहेत. परंतु, यामध्ये एक पद रिक्त असल्यामुळे सर्व कारभार माझ्याकडे असल्यामुळे दिवस-रात्र मी, एकटाच वैद्यकीय अधिकारी कार्यरत असल्यामुळे आरोग्य केंद्राची जबाबदारी सांभाळणे कठीण होत आहे. शासनाने दुसरा वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी शासनाकडे वेळोवेळी केली आहे.
-डॉ. अजय नाथक, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, आगर.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The health system in the health center building at Agar is closed