Video: हिवरखेड-तेल्हारा राज्यमार्ग बनलाय मृत्यूचा सापळा!

धीरज बजाज
Wednesday, 19 August 2020

तब्बल सव्वाशे कोटीचा निधी मंजूर असल्यानंतरही अनेक वर्षांपासून काम सुरू असलेला हिवरखेड तेल्हारा अडसूळ राज्यमार्ग हा मृत्यूचा सापळा बनल्याचे चित्र आहे.

हिवरखेड (जि.अकोला) : तब्बल सव्वाशे कोटीचा निधी मंजूर असल्यानंतरही अनेक वर्षांपासून काम सुरू असलेला हिवरखेड तेल्हारा अडसूळ राज्यमार्ग हा मृत्यूचा सापळा बनल्याचे चित्र आहे.

काही दिवसांपूर्वीच या दुर्गती झालेल्या रस्त्यामुळे दुचाकीचा अपघात होऊन बेलखेड येथील शेतकरी गजानन देवीदास जाधव मृत्युमुखी पडले होते. ते बँकेच्या कामानिमित्त तेल्हारा गेले होते. तेथून परतताना या रस्त्यावर त्यांचा अपघात झाला. अपघातानंतर अकोला येथील इस्पितळात त्यांनी चार दिवस मृत्यूशी झुंज दिली अखेर त्यांची प्राणज्योत मावळली.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

पावसाळा सुरु झाल्यानंतर गत दोन ते तीन महिन्यांपासून या मार्गावरून थोडासाही पाऊस झाल्यास मोठी वाहने तर सोडाच दुचाकी जाणे सुद्धा अशक्य झाले आहे. त्यामुळे वाहनधारकांना अनेक किलोमीटरचे फेरे घेऊन आडमार्गाने प्रवास करावा लागत आहे.

सध्या कोरोना महामारी थैमान घालत असताना गंभीर रुग्णांना हलविण्यासाठी रस्ता खराब असल्याने यंत्रणेपुढेही मोठे आव्हान निर्माण झाले आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे ट्रक, लक्झरी बसेस अडकून पडत असल्याचे चित्र आहे.

थोड्याशा पावसातच शेकडो मोटारसायकली  चिखलामध्ये रुतून बसतात. या रस्त्याच्या अनेक तक्रारी नागरिकांनी आपापल्या लोकप्रतिनिधींना पुढे मांडल्या आहेत. परंतु सर्वच पक्षांचे लोकप्रतिनिधी का गप्प बसले आहेत असा प्रश्न  सुजाण मतदारच आता विचारत आहेत. 

पालकमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्याकडून जनतेला भरपूर अपेक्षा आहेत. अपेक्षेनुसार त्यांनी अकोला जिल्ह्याच्या आढावा बैठकीमध्ये ह्या रस्त्यांबाबत संबंधित ठेकेदाराला आणि अधिकाऱ्याला चांगलेच धारेवर धरले होते आणि दहा दिवसांचा अल्टिमेटम देऊन रस्त्याचे काम करण्यास सांगितले होते.

त्यावर दिखाव्यासाठी ठेकेदारांमार्फत फक्त थातूरमातूर कारवाई करण्यात आली. परंतु अल्टिमेटम देऊन महिन्याच्यावर कालावधी लोटूनही आजरोजी हिवरखेड तेल्हारा आडसुल या राज्यमार्गाची दयनीय अवस्था पाहता संबंधित कंत्राटदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्या नजरेत पालकमंत्र्यांच्या अल्टीमेटमची किंमत शून्य असल्याचे निदर्शनास येत आहे. 

 
संबंधित सर्वच लोकप्रतिनिधी आणि अधिकारी अत्यंत नाकर्ते, निष्क्रिय असल्याने खराब रस्त्यांपोटी माझ्या वडिलांचा मृत्यू झाला. यापुढे प्राणहानी होऊ नये म्हणून  रस्त्याचे काम तात्काळ पूर्णत्वास न्यावे.
- अमोल गजानन जाधव, बेलखेड
(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hivarkhed-Telhara state highway in Akola district has become a death trap!