अकोला - अकोला रेल्वे स्थानकावर शंभर टक्के सुरक्षा असल्याचा दावा प्रशासन करत असतानाच रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वर मंगळसूत्र चोरणाऱ्या एका टोळीनं एका महिलेच्या पतीचा जीव घेतला आहे. या घटनेने रेल्वे स्थानकांच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
दरम्यान खासदार अनुप धोत्रे व आमदार रणधीर सावरकर यांनी रेल्वे प्रशासन व पोलिसांशी संपर्क करून सुरक्षेच्या दृष्टीने कठोर पाऊले उचलण्याच्या सुचना दिल्या आहेत. तसेच आरोपीला लवकरात लवकर जेरबंद करण्याबाबतही सुचीत केले आहे.
सविस्तर असे की, शनिवार, १६ मार्च रोजी रात्री सुमारे ९.४५ वाजता अकोटहून आलेल्या मेमू गाडीतून उतरलेल्या एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरट्यांनी हिसकावून पळ काढला. या घटनेनंतर महिलेच्या पती हेमंत गावंडे यांनी धाडसाने चोरट्यांचा पाठलाग सुरू केला. मात्र, चोरट्यांनी त्यांच्यावरच हल्ला चढवला आणि अमानुष मारहाण करत दगडाने चेहरा ठेचून गंभीर जखमी केले.
हेमंत गावंडे बराच वेळ रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांना तातडीने अकोला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर रेल्वे स्थानकावर सुरक्षा व्यवस्थेचा धागा तुटल्याचे स्पष्ट झाले आहे.
स्थानकावर असामाजिक व घटकांचे वर्चस्व वाढले आहे. चोरटे, भिकारी, बेकायदेशीर फेरीवाले आणि प्रवाशांना त्रास देणाऱ्या टोळ्यांनी परिसर बेशिस्त केला आहे. स्थानकावर पोलिस बंदोबस्त नसल्यासारखी स्थिती असून, हप्तेखोरीच्या आरोपांमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
रेल्वे पोलिसांची कार्यक्षमता संदिग्ध
रेल्वे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. अकोला रेल्वे स्थानकावर स्थानिक पोलिसांची उपस्थिती जवळपास नसल्याने, सुरक्षा चिंतेचा इशारा दिला जात आहे. अशा स्थितीत प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे पोलिसांनी कधी कठोर कारवाई केली, यावर सवाल उपस्थित झाला आहे.
घटनेनंतरचा तपास
घटनेनंतर अकोला पोलीस आणि रेल्वे पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पोलिसांनी पथके गठीत करून आरोपींचा शोध सुरू केला आहे. तथापि, प्रशासन आणि पोलिसांची सुरक्षा सुनिश्चित करण्याची जबाबदारी किती गंभीर आहे, हे दाखविणारा हा प्रश्न उभा राहिला आहे.
रेल्वे प्रवाशांनी आता स्वतःची काळजी स्वतःच घ्यायची का? हा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांमध्ये उपस्थित झाला आहे. जर रेल्वे पोलिसांनी त्वरित कठोर कारवाई केली नाही, तर प्रवाशांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याचा धोका आहे.
पोलिसांनी केले बक्षीस जाहिर
घटनेतील आरोपीची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी बक्षीस जाहिर केल्याची घोषणा केली आहे. यासंदर्भातील कुठलीही माहिती मिळाल्यास पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.