
जिल्ह्यात गुटखा झाला उदंड; गुटखा व पान मसाल्याची अवैध विक्री जोमात
वाशीम : गुटखा व पान मसाल्यावर बंदी असतांना कोणत्याही आस्थापनेतून त्याची चोरट्या पद्धतीने विक्री होत असेल तर त्या आस्थापनेवर कारवाई करून त्याचा परवाना रद्द करण्यात यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी षण्मुगराजन यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना दिले. जिल्ह्यात मात्र गुटखा व पानमसाला खुलेआम सुरू आहे. अवैध गुटखा निर्मीतीचे केंद्र सुद्धा जिल्ह्यात असून याकडे अन्न व औषधी प्रशासन विभाग अर्थपूर्ण दुर्लक्ष करीत असल्याने जिल्हाधिकारी याकडे लक्ष देतील काय? असा प्रश्न या निमित्ताने अधोरेखित होत आहे.
अन्न सुरक्षा व मानके कायदा- २००६ अंतर्गत गठीत जिल्हास्तरीय सल्लागार समितीची सभा जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेला सहाय्यक जिल्हाधिकारी कुलदीप जंगम, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त सागर तेरकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विजय काळबांडे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. श्रीमती देशमुख, नगर पालिका प्रशासन अधिकारी दीपक मोरे, अन्न व औषध निरीक्षक निलेश तातेड व पोलिस विभागाचे चव्हाण यांची उपस्थिती होती. यावेळी जिल्हाधिकारी यांनी गुटखा व पानमसाला विक्री करणाऱ्या आस्थापनेवर कारवाईचे निर्देश दिलेत.
जिल्हयात पोलिस विभागाकडून कारवाया करण्यात येवून मोठ्या प्रमाणात अवैध गुटखा जप्त करण्यात आला. जिल्ह्यात एवढ्या मोठया प्रमाणात अवैध गुटखा कुठून येतो याबाबत पोलिस विभागाकडून कोणतीही चौकशी कधीच होत नाही. कारवाया करतांना एखाद्या छोट्या व्यापाऱ्यावर किंवा साठेबाजावर कारवाई करून जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध गुटखा निर्मिती केंद्रावर जाणूनबुजून दुर्लक्ष करण्यात येत असल्याने पोलिस विभागाच्या कारवायावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
गुटखा विक्रेत्यांवर किंवा साठेबाजांवर करण्यात आलेल्या कारवाया या पोलिस विभागाकडून करण्यात आल्याने तसेच अन्न व औषधी प्रशासन विभागाला याबाबत सर्वकाही माहिती असतांना हा विभाग निद्रावस्थेत असल्याचे सोंग करीत असल्याची चर्चा जिल्ह्यात रंगत आहे. जिल्हाधिकारी षण्मुगराजन यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना गुटखा व पान मसाल्याची चोरट्या पद्धतीने विक्री होत असेल तर त्या आस्थापनेवर कारवाई करून त्याचा परवाना रद्द करण्यात यावा, असे निर्देश दिल्याने जिल्ह्यातील अवैध केंद्राचे काय? असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे.
कारंजा कनेक्शन झाले डोईजड
जिल्ह्यात कारंजा येथूनच गुटख्याचा प्रवास सुरू होतो. वणी पांढरकवडा मार्गे मध्यप्रदेशातून हा गुटखा अमरावतीत येतो कधी थेट कारंजात येतो. येथे सुपारी व इतर साहीत्य वापरून बनावट गुटखा तयार केला जातो. मध्यप्रदेशातून येणार्या गुटख्यात हा गुटखा मिसळला जातो. दररोज या अवैध व्यवसायात कोट्यावधींचा खेळ खेळला जातो जिल्हयात बनावट गुटखा निर्मीती केंद्रात मोठया प्रमाणात गुटखा व पान मसाला बनवून येथील गुटखा छुप्या मार्गाने विदर्भ व मराठवाड्यातील जिल्हयात पोहचण्यात येवून खुलेआम विक्री सुरू आहे. यामधे कारंजा शहर आघाडीवर आहे हा सर्व प्रकार जिल्हयातील पोलीस विभाग व अन्न व औषधी विभागातील काही बडे अधिकारी यांना हाताशी धरून सुरू असल्याची चर्चाही जिल्हयात असून जिल्हाधिकारी यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
Web Title: Illegal Gutka Production Sale Paan Masala Is Rampant District
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..