esakal | पुढील सात वर्षात भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश! 
sakal

बोलून बातमी शोधा

world population day

जागतिक लोकसंख्या म्हणजे जगातील एकूण मानवांची लोकसंख्या. सध्या भारताची लोकसंख्या सुमारे 1 अब्ज 37 कोटी एवढी आहे. मुंबई आणि कोलकाता ही भारतातील सर्वाधिक लोकसंख्येची शहरे आहेत. ठाणे जिल्हा हा देशातील सर्वात जास्त लोकसंख्येचा जिल्हा आहे. 11 जुलै 1987 रोजी जगात 5 अब्जावे अपत्य जन्माला आले, तेव्हापासून हा दिवस 'जागतिक लोकसंख्या दिन’ म्हणून जगभर साजरा केला जातो. 

पुढील सात वर्षात भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश! 

sakal_logo
By
मनोज भिवगडे

अकोला : 11 जुलै 1987 रोजी जगात 5 अब्जाचे अपत्य जन्माला आले तेव्हापासून हा दिवस 'जागतिक लोकसंख्या दिन’ म्हणून जगभर पाळला जात आहे. 1987 ते 2011 पर्यंत जागतिक लोकसंख्या 2 अब्जाने वाढली. 31 ऑक्टोबर 2011 रोजी आपली लोकसंख्या 7 अब्ज झाली. संयुक्त राष्ट्रांच्या ‘वर्ल्ड पॉप्युलेशन प्रॉस्पेक्ट्स 2019’ च्या अहवालानुसार, आगामी 8 वर्षांच्या काळात म्हणजेच 2027 साली भारत देश चीनलाही मागे टाकून जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश म्हणून ओळखला जाणार आहे.

संयुक्त राष्ट्रांनी नुकताच ‘वर्ल्ड पॉप्युलेशन प्रॉस्पेक्ट्स 2019’ चा अहवाल सादर केला. या अहवालात सन 2050 पर्यंत भारताच्या लोकसंख्येत 27 कोटी 30 लाखांची भर पडेल, असाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. जागतिक लोकसंख्येचा हा अहवाल संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक व सामाजिक विभागाच्या लोकसंख्या शाखेकडून तयार करण्यात येतो. या अहवालात भारताची सध्याची लोकसंख्या एक अब्ज 37 कोटी तर चीनची 1 अब्ज 43 कोटी आहे. परंतु सन 2027 पर्यंत भारत लोकसंख्येच्या बाबतीत जगात क्रमांक एकचा देश असेल, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. 
सन 2050 पर्यंत जगाच्या लोकसंख्येत आणखी 2 अब्ज लोकांची भर पडेल म्हणजे येत्या 30 वर्षांत हा आकडा 7 अब्ज 70 लाखापासून 9 अब्ज 70 लाखांपर्यंत जाईल, असेही हा अहवाल सांगतो. एकीकडे भारतासोबत जगाची लोकसंख्या जरी वाढत असली तरी येत्या 31 वर्षांत जगातील 55 देशांमधील लोकसंख्येत एक टक्क्याने घट होणार आहे. 2010 मध्ये 27 देशांच्या लोकसंख्येत एक टक्क्याने घट झाली होती. ज्या 55 देशांमधील लोकसंख्या येत्या 30 वर्षांत घटणार आहे, त्या देशांमध्ये चीनचा समावेश असून, सन 2050 पर्यंत चीनच्या लोकसंख्येत 2.2 टक्के घट होऊन ती तीन कोटी 14 लाखांनी कमी होणार आहे. तर भारताची लोकसंख्या याच काळात 27 कोटी 30 लाखांनी वाढणार आहे. म्हणजे भारताची लोकसंख्या 1 अब्ज 50 कोटी, चीनची 1 अब्ज 10 कोटी, अमेरिका 43 कोटी 40 लाख तर पाकिस्तान 40 कोटी 30 लाख इतकी अंदाजित आहे. येत्या 30 वर्षांत लोकसंख्येच्या संरचनेतही बदल होणार आहेत. त्यानुसार जगाच्या एकूण लोकसंख्येत वृद्धांची संख्या वेगाने वाढत जाणार आहे. 65 वर्ष व त्यापुढील वयोगटातल्या वृद्धांची संख्या सर्वाधिक वेगाने वाढणार आहे. जगातील प्रत्येकी सहा माणसापैकी एक माणूस वयोवृद्ध असेल. 65 व त्यापुढील वयाची लोकसंख्येचे प्रमाण 15 ते 24 वयाच्या लोकसंख्येपेक्षा अधिक असणार आहे. तर पाच वर्षाखालील मुलांची एकूण लोकसंख्येतील टक्केवारी 6 टक्के असेल तर जगातील टक्केवारी 5 असेल. जगाच्या लोकसंख्येचे आयुष्यमानही सन 2050 पर्यंत वाढेल असा अंदाज आहे. जगाच्या एकूण लोकसंख्येत 60 टक्के आशियामध्ये आहे. कारण चीन व भारत हे पहिल्या दोन क्रमांकाचे देश या खंडामध्ये आशियात आहेत.

भारताची लोकसंख्या 1947 मध्ये अंदाजे 36 कोटी होती. 2011 च्या जनगणनेनुसार ती 1.21 अब्ज झाली. म्हणजेच 64 वर्षात भारताची लोकसंख्या तिप्पटीहून अधिक झाली. अंदाजे दोन जनगणनेच्या काळात म्हणजे 10 वर्षात प्रत्येक वर्षी लोकसंख्येत 1.50 ते 1.75 कोटी भर पडत आहे. आपल्या देशात उत्तर प्रदेश, बिहार, उत्तराखंड, झारखंड, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि ओरिसा या आठ राज्यातील लोकसंख्या वाढ विशेष आहे. 1 मे, 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. 1961 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या होती 3.95 कोटी. 1961-1971 दशकात महाराष्ट्राच्या लोकसंख्येत 27.45 टक्के वाढ झाली. नंतरच्या दशकात 1971-1981 वाढ झाली 24.54. 2011 मध्ये महाराष्ट्राची लोकसंख्या 11 कोटीहून अधिक होती. जागतिक लोकसंख्येत पहिले 10 मोठय़ा लोकसंख्येचे देश आहेत चीन, भारत, अमेरिका, इंडोनेशिया, ब्राझिल, पाकिस्तान, बांगलादेश, नायजेरिया, रशिया आणि जपान. 


घट होणे अगत्याचे 
देशातील मोठया लोकसंख्येच्या राज्यात लोकसंख्यावाढीत घट होणे अगत्याचे आहे. त्याचबरोबर लोकसंख्येच्या गुणवत्तेत वाढ व्हायला हवी हाच यंदाच्या जागतिक लोकसंख्या दिनाचा संदेश आहे. लोकसंख्या वाढ ही सर्वच जगासाठी आता चिंतेची बाब बनली आहे, त्यामुळे लोकांनीच याचा गंभीरपणे विचार करून लोकसंख्यावाढीला आळा घालण्याची वेळ आली आहे. 
- प्रकाश द. गवळी, जिल्हा विस्तार माध्यम अधिकारी, आरोग्य विभाग जिल्हा परिषद, अकोला. 

loading image