esakal | एलसीबी कर्मचाऱ्यांवर आरोप करणाऱ्या ट्रान्सपोर्ट संचालकाची चौकशी

बोलून बातमी शोधा

एलसीबी कर्मचाऱ्यांवर आरोप करणाऱ्या ट्रान्सपोर्ट संचालकाची चौकशी
एलसीबी कर्मचाऱ्यांवर आरोप करणाऱ्या ट्रान्सपोर्ट संचालकाची चौकशी
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : राज्याच्या गृहमंत्र्यांच्या नावे दहा लाख रुपयांचा हप्ता मागितल्याचा आरोप स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांवर करणारे विजय ट्रान्सपोर्टचे संचालक अब्दुल आरिफ यांची पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. उपअधीक्षक (गृह) यांच्यापुढे आरिफ यांचे गुरुवारीच बयाण नोंदविण्यात आले. त्यानंतर शुक्रवारी एलसीबीपुढे बयाण नोंदविण्यासाठी गुरुवारीच त्यांना नोटीसही बजावण्यात आली.

ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करणारे अब्दुल आरिफ यांच्याकडे असलेले ट्रकच्या तपासणीवरून एलसीबीच्या पोलिसांनी त्यांना शिविगाळ केली व राज्याच्या गृहमंत्र्यांच्या नावे खंडणी मागितल्याचे पत्र आरिप यांनी मुख्यमंत्री व पोलिस अधीक्षकांना पाठवून खळबळ उडविली होती. या आरोपांची चौकशी करण्याचे आदेश अमरावती विभागाचे पोलिस महानिरीक्षक चंद्रकिशोर मिना यांनी अकोला जिल्हा पोलिस अधीक्षकांना दिले होते. त्यानुसार उपअधीक्षक (होम) यांच्याकडून अब्दुल आरिफ यांना नोटीस बजावून त्यांचे बयान नोंदविण्यात आले. त्यातही त्यांनी पत्रात उल्लेख केल्याप्रमाणे एलसीबीच्या पोलिस कर्मचाऱ्यांवर आरोप लावल्याची माहिती आहे. ही चौकशी सुरू असतानाच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शैलेस सपकाळ यांनी आरिफ यांच्याकडे चौरीचे ट्रक असल्याची माहिती मिळाल्यावरून तपासासाठी गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांवर खंडणी मागितल्याचा आरोप केल्याबाबत तक्रार दाखल झाल्याने चौकशीसाठी उपस्थित राहण्याची नोटीस बजावली आहे.

आरटीओंनी केला १२०० दंड

ट्रान्सपोर्ट संचालकांच्या ज्या ट्रकच्या नंबर प्लेटबाबत स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चौकशी केल्याचे सांगण्यात येत आहे, त्या ट्रकची पाहणी उपप्रादेशिक परिवहन विभागातर्फे करण्यात आली. त्यात नंबर प्लेट नसल्याबाबत हजार रुपये व पीयुशी नसल्याबाबत २०० रुपये असा एकूण १२०० रुपये दंड आरटीओतर्फे २९ एप्रिल रोजी आकारण्यात आला.

सिटी कोतवाली पोलिसांना पोस्टाने तक्रार

ट्रान्सपोर्ट संचालकाची चौकशी वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत सुरू असल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शिविगाळ करून खंडणी मागितल्याची तक्रार देण्यासाठी गेलेल्या आरीफ यांची तक्रार सिटी कोतवाली पोलिसांनी स्वीकारली नाही. त्यांनी ही तक्रार वरिष्ठांकडे करण्याचा सल्ला आरीफ यांना दिला. त्यामुले त्यांनी वकिलांमार्फत ही नोटीस सिटी कोतवाली पोलिसांना पोष्टाने पाठविली आहे.

संपादन - विवेक मेतकर