esakal | लेव्हल क्रॉसिंग डे : फरक तर पडतोच भाऊ! रेल्वे क्रॉसिंग ओलांडतांना येथे गेले शेकडो जीव
sakal

बोलून बातमी शोधा

railway crossing.jpg

दरवर्षी राज्यात मोठ्या प्रमाणात नागरिकांना रेल्वे पटरी क्रॉस करताना जीवाला मुकावे लागते. भारतात आजवर विविध ठिकाणी रेल्वे क्रॉसिंगवरील अपघात झाले.

लेव्हल क्रॉसिंग डे : फरक तर पडतोच भाऊ! रेल्वे क्रॉसिंग ओलांडतांना येथे गेले शेकडो जीव

sakal_logo
By
सागर कुटे

अकोला : गेल्या काही वर्षांमध्ये रेल्वे फाटकांवर होणाऱ्या अपघातांमध्ये वाढ झाली आहे. यातील बहुतांश अपघात हे मानवरहित गेटवरचे आहेत. याबाबत जनजागृती म्हणून दरवर्षी 7 जून हा दिवस जगभर आंतरराष्ट्रीय लेव्हल क्रॉसिंग दिन म्हणून पाळण्यात येतो. मात्र, भारतात असेही रेल्वे अपघात झाले की, त्यामध्ये अंगाचा थरकाप उडाला.

दरवर्षी राज्यात मोठ्या प्रमाणात नागरिकांना रेल्वे पटरी क्रॉस करताना जीवाला मुकावे लागते. भारतात आजवर विविध ठिकाणी रेल्वे क्रॉसिंगवरील अपघात झाले. त्याचप्रमाणे रेल्वे पटरी क्रॉस करताना जीवघेणे अपघात वऱ्हाडातील अकोला, वाशीम व बुलडाणा जिल्ह्यातही होत आहे. भारतात आजवर झालेल्या विविध ठिकाणच्या रेल्वे क्रॉसिंगवरील अपघातांमध्ये सर्वात भीषण अपघात नागपूरनजीक घडला होता व यात तब्बल 55 जणांना प्राण गमवावे लागले होते.

आवश्‍यक वाचा - पेशव्यांनी मुघलांकडे वाशीमचा हा नजराणा देण्याची घातली होती अट 

नागपूरजवळ गेला होता 55 जणांचा जीव
3 फेब्रुवारी 2005 रोजी नागपूरपासून 20 कि.मी. अंतरावर असेलल्या कन्हान येथे एका मानवरहित रेल्वे क्रॉसिंगवर वऱ्हाड्यांच्या ट्रॅक्टरला पॅसेंजरने धडक देऊन 55 जणांचा बळी घेतला होता. अशाच प्रकारचे अपघात जगात आणि देशातही अनेक ठिकाणी घडले. त्यामुळे या विषयावर जनजागृतीची गरज लक्षात घेऊन दरवर्षी 7 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय स्तरावर लेव्हल क्रॉसिंग जनजागृती दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी रेल्वे व्यवस्थापनातर्फे रेल्वे क्रॉसिंग परिसरात क्रॉसिंग ओलांडताना घ्यावयाच्या सुरक्षेविषयी जनजागृती केली जाते. यासाठी पथनाट्ये, पत्रके वाटणे, लोकांशी थेट संवाद साधणे आदी उपक्रम राबविण्यात येतात.

हेही वाचा - सहा महिन्यापूर्वीच घेतला होता त्यांनी आसरा, अन् घरमालकाचाच काढला काटा

2020 मध्ये औरंगाबादचा अपघात धडकी भरवणारा
लॉकडाउनमुळे रेल्वे बंद होती. त्यामुळे अपघाताचे प्रमाणे कमी आढळून आले. मात्र, अशातच रेल्वेने माल वाहतूक सुरू केली. रेल्वेने मध्यप्रदेशातील मजुरांसाठी भोपाळला एक गाडी रवाना केली. त्यामुळे आपल्यालाही एखाद्या अशाच गाडीने गावी जाता येईल, या आशेने जालन्याच्या एका स्टील कंपनीचे ते मजूर रातोरात औरंगाबादकडे पायी निघाले. बदनापूर ते करमाडच्या दरम्यान सटाणा शिवाराजवळ रात्र झाली म्हणून रेल्वे रुळावरच त्यांनी पथारी पसरली आणि झोपी गेले. मात्र, पहाटेच्या सुमारास जालन्याकडून औरंगाबादकडे धडधडत येणाऱ्या मालगाडीचा त्यांना अंदाज आला नाही. त्यामुळे सर्वजण मालगाडीखाली चिरडले गेले. त्यात 16 जणांचा जागीच मृत्यू झाला. हा रेल्वे क्रॉसिंगचा अपघात नसला तरी या अपघाताची भिषणता धडकी भरवणारी होती.

भारतातील रेल्वे क्रॉसिंगवर घडलेले काही प्रमुख अपघात

 • 9 डिसेंबर 1964- देवरिया क्रॉसिंग उत्तरप्रदेश- प्रवाशी बसला रेल्वेची धडक लागून 29 जण ठार.
 • 16 मे 1968 - ब्रेचा रेल्वे स्थानकाजवळ मानवरहित रेल्वे क्रॉसिंगवर एका एक्सप्रेस ट्रेनने बसला धडक दिल्याने 30 जण ठार.
 • 11 सप्टेंबर 1986- पथाली पहाड आसाम येथे बसला रेल्वेची धडक लागून 28 जण ठार.
 • 20 मार्च 1991- अन्नुपूर मध्यप्रदेश- बसची रेल्वेला धडक बसून 35 जण ठार.
 • 10 डिसेंबर 1993- पुणे येथे स्कूलबसला सह्याद्री एक्सप्रेसची धडक लागून 38 जण ठार.
 • 3 मे 1994- आंध्रप्रदेशमध्ये रेल्वेने ट्रॅक्टरला दिल्याने 35 जणांचा मृत्यू.
 • 14 मे 1996 - केरळमधील अलप्पुझ येथे लग्न वऱ्हाड्यांच्या बसला रेल्वेची धडक लागून 35 जण ठार.
 • 25 मे 1996- वाराणशी येथे रेल्वेची ट्रॅक्टरला धडक बसून 25 जणांचा मृत्यू.
 • एप्रिल 1999- लग्नाच्या बसला धडक बसून 45 जणांचा मृत्यू.
 • 3 फेब्रुवारी 2005- नागपूरनजीक वऱ्हाडी घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला पॅसेंजरने उडविले. 55 जण ठार.
 • 7 जुलै 2011- उत्तर प्रदेशात दर्यागंज येथे बसला रेल्वेची धडक लागून 38 प्रवाशांचा मृत्यू.
 • 26 एप्रिल 2018- दर्यागंज येथे रेल्वेची स्कूल बसला धडक लागून 13 जणांचा मृत्यू.

टिप - या अपघातांच्या आकडेवारीत तफावत असू शकते.


मध्य रेल्वेने लेव्हल क्रॉसिंगवरील सुरक्षेसाठी काही महत्त्वाच्या केलेल्या सूचना अशा

 • रेल्वे क्रॉसिंगच्या किमान 20 मीटर आधीच वाहनातचा वेग कमी करा.
 • रेल्वे गाडीच्या हॉर्नकडे लक्ष द्या
 • क्रॉसिंग ओलांडताना रुळाच्या दोन्ही बाजूला पाहून रेल्वे गाडी येत नाही हे पाहून घ्या.
 • क्रॉसिंग ओलांडताना मोबाईलवर बोलू नका.
loading image