शासकीय निवासस्थाने बनली खुराडे | Akola | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अधिकारी व पोलिस कर्मचाऱ्यांना भाड्याच्या घरांचा आश्रय

बाळापूर : शासकीय निवासस्थाने बनली खुराडे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बाळापूर : शहरातील व तालुक्यातील ग्रामीण भागातील शासकीय कार्यालयाच्या इमारती व वसाहती जुन्या काळातील असल्याने त्या जीर्णावस्थेत आहेत. त्यामुळे येथील अधिकारी व शासकीय कर्मचारी मुख्यालयी न राहता अकोला येथे वास्तव्यास आहेत. तर, काहिंना निवासासाठी भाड्यांच्या घराचाच आधार घ्यावा लागतो. बाळापूर शहरातील व तालुक्यातील शासकीय कार्यालयांच्या इमारती तसेच शासकीय निवासस्थाने बांधण्यासाठी राज्य शासनाने प्रयत्नच केले नाही.

बाळापूर हा उपविभागीय स्तरावरचा तालुका आहे. तहसील कार्यालय, पंचायत समिती व अधिकाऱ्यांची निवास्थाने जीर्ण अवस्थेत आहेत. अनेक वर्षापासून जुन्याच इमारतीमध्ये कारभार चालत असून, शासनाने कोणतीही नवीन इमारत उभी केली नाही. न्यायालय सोडले तर, येथील तहसील कार्यालय, पोलिस ठाणे, नगरपरिषद येथे शासकीय कर्मचाऱ्यांसाठी बांधलेली निवासस्थाने तर जणू खुराडे बनली आहे.

पंचायत समिती कार्यालयाजवळ असलेली शासकीय वसाहत व घरे मोडकळीस आल्यामुळे खचण्याच्या अवस्थेत आहे. त्यामुळे बेरेचसे अधिकारी भाड्याने राहतात. गटविकास अधिकारी व उपविभागीय पोलिस अधिकारी हे देखील भाड्याच्या घरात गुजरान करीत आहेत. तर, उपविभागीय अधिकारी, मुख्याधिकारी, कृषी अधिकारी आणि तहसीलदार अकोला येथे वास्तव्यास आहेत.

हेही वाचा: नागपूर : किंगमेकर अटलबहादूर सिंग अनंतात विलिन

पोलिस निवास्थाने ओस

ज्यांनी जनतेच्या सुरक्षेसाठी आपली सारी सेवा खर्च करायची, त्यांनाच आपल्या रक्षणासाठी दुसऱ्या ओसरीवर रहावे लागत आहे. ही अवस्था आहे बाळापूर व उरळ पोलिसांची. जनतेच्या रक्षणासाठी दिवस-रात्र कार्यरत असणाऱ्या पोलिसांना किमान सेवेत असताना तरी, सुस्थितीत राहता यावे यासाठी पोलिस वसाहत बांधण्यात आली. बाळापूर व उरळ येथे पोलिस कर्मचाऱ्यांसाठी बांधलेल्या या इमारतीची मोठ्या प्रमाणात पडझड झाली असून, ही इमारत अखेरचा घटका मोजत आहे. त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. बाळापूरातील ३३ व उरळ येथील सहा निवासस्थाने शेवटच्या घटका मोजत आहेत.

आपले कुटुंब गावी पाठविण्यातच धन्य

उरळ व बाळापुरातील निवास्थानाचे छप्पर, खिडक्या, दरवाजे, फरशी, शौचालये, विद्युतीकरण पूर्णपणे निकामी झाले आहे. तर, सर्वच भिंतीची पडझड झाली आहे. इमारतींच्या आत घुशी, सापांचा वावर वाढला आहे, झुडपांचे साम्राज्य पसरले आहे. या इमारतीचे दारे, खिडक्या गायब झाले असले तरी, दगडीही काढून नेले आहेत. त्यामुळे या इमारतीला भकास स्वरुप प्राप्त झाले. नवीन बदली होऊन येणाऱ्या कर्मचाऱ्यांनी खासगी घरमालकांच्या घरात आश्रयाला थांबले असल्याचे चित्र आहे.

बहुतांशी पोलिस कर्मचाऱ्यांनी आपली कुटुंबे आपआपल्या गावी पाठविण्यात धन्यता मानली आहे. अकोला किंवा आपल्या राहत्या गावातून ये-जा करून आपली तातडीची नोकरी सांभाळत आहेत. त्यामुळे पोलिसांना बाळापूर व उरळ येथे कर्तव्य बजावत आपल्या कुटुंबीयांशी सततचा संपर्क ठेवावा लागतो. त्यामुळे याचा परिणाम त्यांच्या कामावार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आरोग्य अधिकाऱ्यांची निवास्थानेही ओस

तालुक्यातील हातरूण, पारस, उरळ व वाडेगावातील १६ निवास्थानांमध्ये पाण्याची सुविधा नाही व काही इमारतीमध्ये स्वच्छतागृहांची वाईट परिस्थीती असल्याने तेथील कर्मचारी भाड्याने राहतात. वाडेगावातील निवास्थानांची दुरुस्तीचे काम सुरू आहे.

loading image
go to top