
पेट्रोल डिझेलवरील व्हॅट कमी केल्यामुळे सामान्य जनतेला दिलासा
अकोला : पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित करात (व्हॅट) कपात करत पेट्रोल आणि डिझेल अनुक्रमे ५ आणि ३ रुपयांनी स्वस्त करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर महानगराध्यक्ष विजय अग्रवाल यांनी स्वागत केले आहे. एका प्रसिद्धी पत्रकात भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल यांनी म्हटले आहे की, केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलवरील उत्पादन शुल्कात दोनदा कपात केली. त्याचवेळी भारतीय जनता पार्टीने राज्यात सत्तेत असलेल्या तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने पेट्रोल डिझेलवरील व्हॅटमध्ये कपात करावी अशी मागणी सातत्याने केली होती. केंद्र सरकाच्या निर्णयाचे अनुकरण करत भारतीय जनता पार्टीची सत्ता असलेल्या राज्य सरकारांनी इंधनावरील करात कपात केली होती. महाविकास आघाडी सरकारने मात्र इंधनावरील व्हॅट कमी करण्याच्या भारतीय जनता पार्टीच्या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत आल्या-आल्या इंधनावरील व्हॅटमध्ये कपात करत सामान्य जनतेला मोठा दिलासा दिला आहे. या निर्णयाबद्दल भारतीय जनता पार्टी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करत आहे, असेही अकोला जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर महानगराध्यक्ष विजय अग्रवाल यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे. केंद्र आणि राज्य यांच्या सहकार्याचे नवे पर्व महाराष्ट्रात सुरू झाले असून ''सबका साथ, सबका विकास'' हा पंतप्रधान मोदी यांचा मंत्र श्री. शिंदे व श्री. फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्राच्या विकासाला नवी गती देईल असा विश्वास आमदार सावरकर अग्रवाल. यांनी व्यक्त केला.
Web Title: Maharashtra Govt Cuts Vat On Petrol Diesel By 5 And 3 Per Litre Respectively Cm Eknath Shinde Vijay Aggarwal Akola
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..