सैन्यात भरती होण्याचं स्वप्न अपूर्णच, कोवळ्या वयात करुण अंत

amol
amolamol

मोताळा (जि. बुलडाणा) : शुक्रवारची जीवघेणी पहाट... अवघे गाव साखरझोपेत असताना सैन्य भरती व पोलिस भरतीचे स्वप्न उराशी बाळगून असलेले डिडोळा येथील अमोल गाढे (१९) व कमलेश जुनारे (१९) हे दोन युवक रनिंग व सरावासाठी मलकापूर रस्त्याकडे निघाले. याच रस्त्यावर नगरपंचायतीचे कर्मचारी दीपक कायस्थ (४५) हे मॉर्निंग वॉक करीत होते. अचानक अज्ञात वाहनाच्या रुपात काळ धावून आला. अपघातात अमोल गाढे व दीपक कायस्थ यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. तर, गंभीर जखमी कमलेशची मृत्यूशी झुंज सुरू आहे. अमोलवर काळाने घाला घातल्याने त्याचे सैन्यात भरती होऊन देशसेवा करण्याचे स्वप्न अधुरे राहीले आहे.

amol
खासदार गवळींना वर्षा बंगल्यावर नो एंट्री? गेटवरूनच परतल्या माघारी

तालुक्यातील डिडोळा बु. येथील शेतकरी निनाजी भिकाजी गाढे व शारदा निनाजी गाढे यांचा मुलगा अमोल (१९) हा बारावी उत्तीर्ण झाला होता. सैन्य भरतीचे स्वप्न उराशी बाळगून अमोलने सराव सुरू केला. त्याच्या सोबतच बारावी उत्तीर्ण झालेला कमलेश शिवाजी जुनारे (१९) हा युवक सुद्धा पोलिस भरतीची तयारी करीत होता. शिवाजी समाधान जुनारे व सुहासिनी शिवाजी जुनारे यांचा कमलेश हा एकुलता एक मुलगा आहे. या दोघा युवकांसोबत गावातील मित्रमंडळी नित्यनेमाने सराव करायची. मात्र, शुक्रवारी (ता.१) पहाटे हे दोघे युवक सर्वात आधी सरावासाठी निघाले. दोघेजण डिडोळा फाट्यापर्यंत पोहोचले. यावेळी मोताळा नगरपंचायतीचे पाणीपुरवठा कर्मचारी दीपक रामनाथ कायस्थ (४५) हे या रस्त्यावर मॉर्निंग वॉक करीत होते. एवढ्यात नियतीने डाव साधला. अज्ञात वाहनाने तिघांना जबर धडक दिली. या अपघातात अमोल गाढे व दीपक कायस्थ यांचा जागीच मृत्यू झाला. तर, कमलेश जुनारे हा युवक गंभीर जखमी झाला. कमलेशची प्रकृती चिंताजनक असून, त्याची औरंगाबाद येथील रुग्णालयात मृत्यूशी झुंज सुरू आहे. अमोलच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून त्याच्या पार्थिवावर डिडोळा येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. तर, दीपक कायस्थ यांचा मृतदेह शवविच्छेदनानंतर देऊळगाव राजाकडे रवाना करण्यात आला. सैन्यदलात भरती होऊन देशसेवा करण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या अमोलचा कोवळ्या वयात करुण अंत झाल्याने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या कुटुंबीयांचा आक्रोश बघून अनेकांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या. या दुर्दैवी घटनेने डिडोळा गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

अन् परमनंट नोकरीचा आनंद टिकला नाही

देऊळगाव राजा येथील दीपक रामनाथ कायस्थ हे मागील अनेक वर्षांपासून देऊळगाव राजा नगरपालिकेत अस्थायी चपराशी म्हणून कामाला होते. काही महिन्यांपूर्वी त्यांचे समावेशन होऊन मोताळा नगरपंचायतमध्ये त्यांना पाणीपुरवठा कर्मचारी म्हणून परमनंट जॉब मिळाला होता. रोजंदारीवर असलेले दीपक कायस्थ आता कायमस्वरूपी कर्मचारी बनले होते. परंतु, त्यांचा परमनंट नोकरीचा आनंद जास्त काळ टिकला नाही. या अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने मोताळा नगरपंचायत वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com