esakal | मंगरुळपीर : १६७ जणांचा सहकुटुंब इच्छा मरणाचा निर्धार
sakal

बोलून बातमी शोधा

ST

मंगरुळपीर : १६७ जणांचा सहकुटुंब इच्छा मरणाचा निर्धार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मंगरुळपीर (जि. बुलडाणा) : पूर असो की नैसर्गिक आपत्ती, कोरोनाची महामारी की, निवडणूकीची धामधूम, यामध्ये एसटी महत्त्वाची भूमिका बजावते. मात्र, या एसटीला चालविणारे चालक व वाहक अपूऱ्या व अनियमित वेतनाने त्रासून गेले आहेत. म्हणायला नोकरी मात्र, पोट भरण्याची मारामार, या परिस्थितीत किमान इच्छा मरणाची परवानगी द्यावी, अशी उद्वेग्न मागणी मंगरुळपीरच्या १६७ कर्मचाऱ्यांनी केली आहे.

मंगरुळपिर परिवहन महामंडळाच्या १६७ कर्मचाऱ्यांनी राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोशयारी यांना पाठविलेल्या निवेदनाद्वारे सह कुटुंब ईच्छा मरणाची परवानगी मागितली या आशयाचे निवेदन त्यांनी येथील तहसीलदारांच्या मार्फत दिले. मंगरुळपीर परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ते रात्रंदिवस इमानेइतबारे प्रवाशांना सुविधा देतात आणि ते त्यांचे कर्तव्यच आहे. कोरोना सारख्या भयंकर परिस्थितीतही त्यांनी जीवाची पर्वा न करता प्रवाशांसाठी सेवा दिली.

हेही वाचा: महाराजांना Petrol परवडत नाही, मग BMW कशावर चालवणार?

प्रवाशांची सेवा करीत असताना त्यांना घरपरिवार आहे याची जाणीव सरकारने ठेवावी. राज्यावर आलेल्या प्रत्येक संकटाची जाणीव त्यांना आहे. कोरोना संसर्ग असो वा, पूरपरिस्थिती ते त्यांचे काम चोख करीत असतात. परंतु, त्यांना त्यांच्या कामाचे दाम वेळेवर मिळत नसल्याने त्यांच्या परिवारावर उपासमारीची वेळ आली आहे. सार्वजनिक उपक्रमांपैकी सर्वात कमी पगार असलेली संस्था म्हणजे राज्य परिवहन महामंडळ आहे आणि तोच पगार त्यांना वेळेवर मिळत नसल्यामुळे परिवारातील अनेक अडचणींचा सामना त्यांना करावा लागतो.

मुलांची शैक्षणिक फी भरण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नसल्याने मुलांच्या शिक्षणात अडचणी येत आहेत. नुकताच राज्य शासनाने ३३ महामंडळांना सातवा वेतन आयोग लागू करण्याची अधिसूचना जारी केली असून, त्यामध्ये राज्य परिवहन महामंडळाचा समावेश नाही. हे त्यांचे दुर्भाग्यच म्हणावे लागेल. सातवा वेतन आयोग त्यांना लागू केला नाही तरी चालेल परंतु, त्यांच्या हक्काचा पगार तरी राज्य परिवहन महामंडळाने वेळेवर द्यावा. एक कुटुंबातील प्रमुख म्हणून, कुटुंब जबाबदारी निभावण्यास ते असमर्थ ठरत असल्याने त्यांना सहपरिवार इच्छा मरणाची परवानगी द्यावी, असे राज्यपालांना पाठविलेल्या निवेदनात नमूद आहे. या निवेदनावर येथील १६७ वाहक, चालक व कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

कायम उपेक्षेचे वाटेकरी

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ म्हणजेच सर्वसामान्यांची एसटी सर्वांसाठी विश्वासक आहे. आजही बहुतेक नागरिक प्रवासासाठी एसटीलाच पसंती देतात. हा विश्वास महामंडळाने त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या बळावर कमावलेला आहे. रात्रफेऱ्या, कधी एखाद्या खेडेगावात मुक्काम, पाऊसपाण्यात जनतेला दिलासा मात्र, मोबदला शेतमजूरापेक्षाही कमी. अशी परिस्थिती महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची झाली आहे. अनेक सरकारे आली अन् गेली एसटी मात्र कायम गाळात रुतलेलीच राहिली. आज कर्मचाऱ्यांवर इच्छामरणाची परवानगी मागण्याची वेळ यावी हे दुर्दैवी आहे.

loading image
go to top