
अकाेला : शहरातील मुख्य रस्ता खड्ड्यात
मंगरुळपीर : मंगरुळपीर शहरातील मुख्य रस्त्याची दिशा आणि दशा एखाद्या ग्रामीण भागातील रस्त्यासारखी झाली आहे. छत्रपती शिवाजी चौकापासून ते बिरबलनाथ महाराज मंदिरापर्यंत खड्ड्यांची मालिका आहे. परंतु येथील नगर परिषद बांधकाम विभाग कोणाकरिता आहे हा प्रश्न अनुत्तरित आहे.
मंगरुळपीर नगर परिषदेच्या अंतर्गत शहरात जे वेगववेगळ्या प्रभागांमध्ये रस्ते तयार करण्यात आले आहेत, किंवा सुरू आहेत ते ही सर्व रस्ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहेत. यामध्ये सध्याचे मुख्याधिकारी, कंत्राटदार व मंगरुळपीरचा बांधकाम विभागाच्या कमिशन खोरीमुळे शहराचे वाटोळे होत आहे. मंगरुळपीरची नगरपालिका दर्जाहीन कामात जिल्ह्यात कुप्रसिद्ध आहे. सध्या नगरपरिषदेचा बांधकाम विभाग भ्रष्टाचारामुळे वादाच्या भोवऱ्यात आहे.
मुख्याधिकारी व कंत्राटदार यांच्या भ्रष्टाचारी संगनमतामुळे शहरातील सर्व रस्त्यांची अल्पावधीतच पार वाट लागणार असल्याचे चित्र सध्या शहरात सगळीकडे होत असलेल्या रस्त्यांच्या निकृष्ट दर्जाच्या कामाला बघितल्यावर होते. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून तर बिरबलनाथ मंदिरापर्यंत या मुख्य रस्त्याची दशा नगर परिषदेच्या कमिशनखोरीमुळे झाली आहे. रस्त्याच्या कामासाठी लाखो रुपयांचा निधी आला.
परंतू रस्त्याच्या कामात चांगल्या दर्जाच्या साहित्याचा वापर केला नाही तर सिमेंटही कमी प्रमाणात वापरण्यात आल्याची माहिती आहे. या रस्त्याच्या कामाकडे मुख्याधिकारी व बांधकाम विभागाकडून जाणूनबुजून दुर्लक्ष केल्या जाते. सध्या शहरातील विविध ठिकाणी सुरू असलेले काम अतिशय हलक्या प्रतीचे होत असल्याने रस्त्यावर खर्च केलेल्या शासनाच्या निधीत भ्रष्टाचाराची होळी संगनमताने केल्या जात आहे. पुढच्या पावसाळ्यात रस्ता पाण्यात जाणार आहे. सध्या सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामाची सखोल चौकशी करून याबाबत मुख्याधिकारी, कंत्राटदार व नगरपालिकेच्या बांधकाम विभागाला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कारवाई करून संबंधित कंत्राटदाराचे देयक अदा न करण्याची मागणी सुद्धा शहरातील नागरिकांनी केली आहे.
रस्ते की कमिशनखोरांचे कुरण
एखादा रस्ता खराब झाल्यानंतर त्याचे टेंडर काढायचे, मर्जीतील कंत्राटदाराला ते द्यायचे. त्यातून कमिशनचा मलिदा लाटायचा हा प्रघात सुरू आहे. यानंतर कंत्राटदाराने केलेला कोट्यवधीचा रस्ता चार महिन्यात खड्ड्यात गेला तरी कोणी याची दखल घेत नाही. पुन्हा दुसऱ्या वर्षी त्याच रस्त्याचे नाव बदलून नवीन निविदा काढायची हे चक्र सुरू आहे. त्यामुळे हे रस्ते की कमिशनखोरांचे कुरण असा प्रश्न निर्माण झाला आहे.