Elections : काँग्रेसचा स्वबळाचा नारा! प्रदेशाध्यक्षांनी दिला तयारी करण्याच आदेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nana patole

काँग्रेसचा स्वबळाचा नारा! शिवसेना, राष्ट्रवादीच्या भूमिकेकडे लक्ष

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : महानगरपालिका निवडणुकीसाठी (Municipal Elections) महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेसने स्वबळाची तयारी सुरू केली आहे. शिवसेना व राष्‍ट्रवादी काँग्रेस किंवा अन्य कोणत्याही पक्ष, संघटनांची मदत न घेता निवडणूक स्वतंत्रपणे लढण्यासाठी तयारीचे आदेश काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी महानगराध्यक्ष व जिल्हाध्यक्षांना दिले आहे.

पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये अकोला महानगरपालिकेची निवडणूक होणे अपेक्षित आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाने तीन सदस्यीय प्रभाग रचनेचा आराखडा तयार करण्याचा आदेश मनपा प्रशासनाला दिला आहे. त्याचे काम अंतिम टप्प्प्यात आहे. कच्चा आरखडा निवडणूक आयोगाकडे ३० नोव्हेंबरपर्यंत सादर केला जाणार आहे. अकोला मनपात एकूण ३० प्रभागात ९१ सदस्य राहतील. निवडणूक आयोगासोबतच राजकीय पक्षांनीही निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.

हेही वाचा: ...अन् मध्यरात्री आईला मुलगी प्रियकरासोबत दिसली नको त्या अवस्थेत

काँग्रेसने या निवडणुकीत कोणत्याही पक्ष किंवा संघटनेच्या कुबड्या न घेता स्वबळावर निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्धार केला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा स्वबळाचा आदेश २४ नोव्हेंबर रोजी महानगराध्यक्ष व जिल्हाध्यक्षांना सरचिटणीस देवानंद पवार यांच्यामार्फत पोहोचला आहे.

कुठलीही तडजोड नाही

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलेल्या आदेशात आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत काँग्रेस पक्ष कुठलीही तडजोड करणार नाही. स्वबळावरच निवडणूक लढविण्याची तयारी जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते व पदाधिकारी यांच्यासोबत चर्चा करून सुरू करा, असा आदेश नानांनी शहर व जिल्हा काँग्रेस समितीच्या अध्यक्षांना दिला आहे. सोबतच बूथ कमिटींची तपशीलवार माहितीही प्रदेशाध्यक्षांनी मागविली आहे. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात सुस्त पडलेल्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडताना दिसत आहे.

हेही वाचा: हॉट अभिनेत्री मीरा जगन्नाथचे पोझ बघितले का?

काँग्रेस-वंचित आघाडीच्या चर्चेला पूर्णविराम

भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या तीन प्रमुख पक्षांच्या विरोधात काँग्रेस वंचित बहुजन आघाडीला सोबत घेऊन नवीन आघाडीची मोट अकोला शहरात बांधेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी २४ नोव्हेंबर रोजी दिलेल्या पत्रात कोणतीही तडजोड न करता स्वबळावर निवडणूक लढविण्याचा आदेश काँग्रेसच्या शहर व जिल्हाध्यक्षांना दिल्याने वंचितसोबतच्या आघाडीच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र येणार?

काँग्रेसचा स्वबळाचा नारा पुन्हा एकदा नाना पटोले यांच्या पत्राने बुलंद झाल्याने महाविकास आघाडीतील काँग्रेस हा घटक पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी बाहेर पडला हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीतील शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेससह प्रहार जनशक्ती पक्षाच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. शिवसेना-राकाँ हे पक्ष मनपा निवडणूक एकत्र लढण्याची शक्यताही आता अधिक वाढली आहे.

loading image
go to top