अरे बापरे! सर्वोष्ण शहरांच्या यादीत या शहराचे नाव; जणू काही जगातील उष्णतेचे केंद्र बनन्याकडे...

temperature in akola.jpg
temperature in akola.jpg

अकोला : हिवाळा असो किंवा पावसाळा अकोल्यात उन्हाचे टचके झोंबतातच आणि उन्हाळ्यात तर दरवर्षी तापमानाचा आलेख उंचावतच आहे. त्यामुळे जगातील सर्वोष्ण शहरांच्या यादीत अकोल्याचे नाव नोंदले गेले असून, जणू काही जगातील उष्णतेचे केंद्र बनन्याकडे अकोल्याची वाटचाल सूरू आहे. हे संकट रोखण्यासाठी आताच युद्धपातळीवर उपाययोजना करणे गरजेचे असून, त्यासाठी वृक्षसंवर्धन, पाण्याचे व्यवस्थापन आणि प्रदूषणावर नियंत्रण मिळविणे सर्वात आवश्यक असल्याचे हवामान तज्ज्ञांनी सांगितले.

1980 च्या पूर्वी जिल्ह्यातील तापमाचा आढावा घेतल्यास येथे उन्हाळ्यात सर्वाधिक 35 ते 40 च्या दरम्यान कमाल तापमाणाची नोंद झाल्याचे दिसून येते. परंतु त्यानंतर दरवर्षी जिल्ह्यात तापमान वाढतच आहे. गेल्या चार वर्षात तर, पारा 48 अंशावर पोहचला आणि जगातील सर्वाधिक तापमान असलेल्या शहराच्या यादीत कधी दुसऱ्या तर कधी चवथ्या क्रमांकावर अकोल्याचे नाव झळकले. अकोल्यातच तापमानाचा हा वाढता आलेख का? याबाबत हवामान अभ्यासकांकडून जाणून घेतले असता, उत्तरायण काळात मे मध्ये सूर्य अकोला, जळगाव, नंदूरबार, नागपूर या जिल्ह्यांच्या जवळ असतो. त्यामुळे येथे उष्णता व गर्मी अधिक असते. अकोल्यात जंगल, वृक्ष संख्या, पहाडी क्षेत्र कमी झाल्याने, नद्या कोरड्या पडल्याने व प्रदूषण वाढल्याने इतर जिल्ह्यांच्या तुलनेत तापमान अधिक राहत असल्याचे हवामान तज्ज्ञांनी सांगितले.

नोंदणी यंत्रणेवर प्रश्नचिन्ह!
यापूर्वी जिल्ह्यातील प्रजन्यमान मोजणीसंदर्भात व यंत्रणेच्या नादुरुस्तीबदल प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील तापमान नोंदणी यंत्रणा कितपत सक्षमतेने व अचूकपणे कार्य करीत आहे, यावरही काही अभ्यासकांकडून प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले आहे. जिल्ह्यातील दरवर्षी वाढीव तापमान नोंदणीसाठी संबंधीत यंत्रणेतील काही उणीवा सुद्धा कारणीभूत असू शकतात. त्यामुळे प्रत्येक तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी तापमानाची मॅन्यूअली नोंद घेऊन, नोंदणी यंत्रणा अचूक मापन करत असल्याबाबत खात्री करणे गरजेचे असल्याचे हवामान अभ्यासकांनी सूचविले आहे.

वाढत्या तापमानावर कसा लागेल ब्रेक?

  • वृक्षतोड थांबविणे
  • वृक्ष लागवड व संवंर्धन
  • पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापन
  • पाण्याच्या वापराचे नियोजन
  • उन्हाळी पिकांचे आच्छादन वाढविणे
  • शोषखड्डे निर्माण करणे
  • औद्योगिक वसाहतीमध्ये वृक्षलागवड
  • नद्या पुर्नजिवीत करणे
  • वाळू उपसा कमी करणे
  • जंगल क्षेत्र वाढविणे

जिल्ह्यात तापमान वाढीची कारणे

  • नद्यांमधून वाळूचा मोठा उपसा
  • काँक्रेटिकरण, डांबरीकरण
  • उद्योग व वाहनांद्वारे वाढलेले प्रदूषण
  • वृक्षतोड, जंगलतोड, वृक्ष संवंर्धनाचा अभाव
  • पाण्याचा अतिवापर, सिंचनक्षेत्राचा अभाव
  • 'एसी'च्या संख्येत प्रचंड वाढ व सातत्याने वापर
  • पेरणी क्षेत्र घटल्याने उघडी पडत असलेली जमीन

अकोल्यात इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अधिक तापमान जाणवते
सध्या सूर्याचे उत्तरायण सुरू असून, तो अकोला शहराच्या जवळपास आहे. अकोला शहराचे अक्षवृत्तावर 20.7 उत्तर हे स्थान आहे. साधारण तीन दिवस आधी म्हणजे 26 मे रोजी सूर्य पूर्णपणे डोक्यावर होता, त्या दिवशी दुपारी 12 वाजता आपली सावली 'गायब' झाली होती. ज्या वेळेस अशी स्थिती असते त्या वेळेस सूर्याची जास्त उष्णता त्या अक्षवृत्तावर एकवटलेली असते, परिणाम जास्त तापमान व गर्मी. हा अनुभव जळगाव शहरात पण येतो. अकोला आणि जळगाव ही ठिकाण एकमेकांना बरेच समांतर आहेत. परंतु, जळगाव व इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अकोल्यात वृक्ष संख्या कमी व प्रदूषण, जंगलतोड अधिक, पाऊस कमी, पेरणी क्षेत्र घेटले आहे. त्यामुळे अकोल्यात इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अधिक तापमान जाणवत आहे.
- संजय अप्तूरकर, हवामान तज्ज्ञ, नागपूर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com