
Akola : राष्ट्रीय महामार्गावरील निर्माणाधीन पूल कोसळला!
मूर्तिजापूर : एकीकडे रस्ता निर्मितीचा जागतिक विक्रम करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेल्या राष्ट्रीय महामार्ग ५३ च्या चौपदरीकरणाच्या कामाच्या विश्वासार्हतेवर निर्माणाधीन पूल कोसळल्यामुळे प्रश्नचिन्ह लागले आहे.
राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाच्या कामादरम्यान मूर्तिजापूर तालुक्यातील अनभोरा येथील पुलाचा स्लॕब शुक्रवारी मध्यरात्री दरम्यान कोसळला. सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही. परंतु, स्लॕब जमीनदोस्त झालेल्या या कामाबाबत साशंकता निर्माण झाली आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणाच्या कार्यक्षमतेवरही त्यामुळे भले मोठे प्रश्नचिन्ह लागले आहे. या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असून, अनभोरा गावाजवळ उड्डाण पुलाची निर्मिती करण्यात येत आहे. या पुलाच्या स्लॅबचे काम पूर्णही झाले.
परंतु, शुक्रवारी च्या मध्यरात्री तो कोसळला. रात्रीची वेळ असल्यामुळे मोठा अनर्थ टळला. या उड्डाणपुलाचे काम अनेक महिन्यांपासून संथगतीने सुरू आहे. या दरम्यान अनेक अपघात या रस्त्यावर घडत आहेत. राजपथ इन्फ्राक्रॉन कंपनी हे काम करीत असून, पुलाचा स्लॅब कोसळल्याने कंपनीच्या कामाबाबत अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. ग्रामस्थ प्रकारामुळे संतप्त झाले असून, या पुलालगतच असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमुळे संथगतीने चाललेल्या कामामुळे शिक्षण प्रक्रिया बाधित होते आहे. शाळेत ये-जा करतना विद्यार्थ्यांचा जीव नेहमीच धोक्यात रहातो, त्यामुळे राजपथ इन्फ्राक्राॕन कंपनीच्या अशा कामाच्या गुणवत्तेकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
पूल कोसळला नाही, पाडला!
सेट्रींग चुकीच्या पद्धतीने लागल्यामुळे स्लॕब झुकला. शुक्रवारी (ता.२३)च्या मध्यरात्री काँक्रिटीकरण करताना ही बाब लक्षात आली. भविष्यात तो पडून जीवितहानी होण्याची शक्यता विचारात घेऊन तो पाडण्यात आला, कोसळला नाही.
- श्रीकांत ढगे, उप महाप्रबंधक, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण.