Washim : वाशीमच्या मिनिमंत्रालयावर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

NCP

वाशीमच्या मिनिमंत्रालयावर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा

वाशीम : नऊ महिन्याच्या प्रदिर्घ कालावधीनंतर जोरदार कमबॅक करीत वाशीम जिल्हा परिषदेमध्ये पुन्हा एकदा ठाकरे सरकार आरूढ झाले. राष्ट्रवादी काँग्रेसने पूर्वीसारखेच काँग्रेस व शिवसेनेला सोबत घेवून वाशीम जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीचा झेंडा रोवला. यामध्ये जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्रकांत ठाकरे यांची बिनविरोध निवड झाली.

पोटनिवडणुकीनंतर ३१ जागा जिंकून निर्भेळ बहुमत प्राप्त झाल्याने वाशीम जिल्हा परिषदेमध्ये पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेना या महाविकास सत्ता स्थापनेची निर्वीवाद सत्ता येण्याचे संकेत होते. अशातच जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव निघाल्यामुळे मिनी मंत्रालयात सत्ता स्थापनेच्या दिशेने एक आठवड्यापासून राजकीय हालचाली सुरू होत्या.

वाशीम जिल्हा परिषदेच्या ५२ आणि सहा पंचायत समितीमधील १०४ जागासाठी ७ जानेवारी २०२० रोजी निवडणूक झाली होती. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक १२ जागा जिंकून जिल्हा परिषद वर्तूळात आपला दबदबा कायम ठेवला तर, त्या खालोखाल काँग्रेसने ९, शिवसेना ६, भाजप ७, वंचित ८, अपक्ष ३, जन विकास आघाडी ६ आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेने एका जागेवर विजय प्राप्त केला होता.

महाराष्ट्राच्या राजकारणात उदयास आलेल्या महाविकास आघाडीचा प्रयोग त्यावेळी वाशीम जिल्हा परिषदेत सुद्धा बघायला मिळाला. फार्म्यूल्याच्या आधारे त्यावेळी अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्रकांत ठाकरे तर, उपाध्यक्षपदी काँग्रेसचे डॅा. शाम गाभणे यांची वर्णी लागली होती. महाविकास आघाडीच्या या टिमने सुमारे चौदा महिने जिल्हा परिषदेची सत्ता उपभोगली.

दरम्यान, ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर खारीज झालेल्या जिल्हा परिषदेच्या ओबीसी प्रवर्गातील १४ आणि पंचायत समितीमधील २७ जागासाठी ऑक्टोबर २०२१ मध्ये निवडणूक पार पडली. जिल्हा परिषद सभागृहात सध्या राष्ट्रवादी काँग्रेस १४, काँग्रेस ११, शिवसेना ६, भाजप ७, वंचित ६, जन विकास आघाडी ५, अपक्ष २ आणि स्वाभिमानी एक असे पक्षीय बलाबल आहे.

जिल्हा परिषदेच्या वसंतराव नाईक सभागृहात १९ नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजता निवडणूक प्रक्रियेस प्रारंभ झाला. यावेळी अध्यक्षपदाकरिता राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्रकांत ठाकरे यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे निर्धारित वेळेनंतर पिठासीन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रकाश राऊत यांनी चंद्रकांत ठाकरे बिनविरोध निवडून आल्याची घोषणा केली. यावेळी जिल्हा परिषद सभागृहासमोर ठाकरे समर्थकांनी गुलाल उधळून व फटाके फोडून आनंद साजरा केला. निवडणुकीपूर्वी आज दुपारी १२ वाजता स्थानिक स्वागत लॉनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व काँग्रेसच्या नेते व पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत अध्यक्षपदाच्या उमेदवारीबाबत झालेल्या चर्चेअंती चंद्रकांत ठाकरे यांचे एकमेव नाव समोर आले.

loading image
go to top