esakal | दिग्गजांची नामनिर्देशपत्र झाले दाखल, आता लक्ष माघारीकडे
sakal

बोलून बातमी शोधा

दिग्गजांची नामनिर्देशपत्र झाले दाखल, आता लक्ष माघारीकडे

दिग्गजांची नामनिर्देशपत्र झाले दाखल, आता लक्ष माघारीकडे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वाशीम ः जिल्हा परिषदेच्या पोट निवडणुकीत नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक दिग्गजांनी दुसऱ्या सर्कलमधे नामनिर्देशन पत्र दाखल केले आहेत, तर काही ठिकाणी विद्यमान सदस्यांनी दुसऱ्याच पक्षाची उमेदवारी घेतल्याने शेवटचा दिवस सोमवार (ता.५) राजकीय वर्तुळात चर्चेचा ठरला आहे. चौदा जागांच्या पोट निवडणुकीत सत्ताधारी गटाचा कस लागण्याची शक्यता व्यक्त होत असून, माघारीनंतर सर्व चित्र स्पष्ट होणार आहे. (Nominations have been filed, now look back)


जिल्हा परिषदेतील १४ व पंचायत समितीतील २७ जागांसाठी पोट निवडणूक जाहीर झाली आहे. इतर मागास प्रवर्गातील आरक्षण ५० टक्केच्यावर गेल्याने सर्वोच्च न्यायालयने ता. ४ मार्चला ही पदे रिक्त केली होती. निवडणुकीच्या नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक दिग्गजांनी आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले. यामध्ये आसेगाव गटातून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी अर्ज दाखल केला आहे. याच गटातून राकाँचे माजी जिल्हाध्यक्ष सुभाष राठोड व राकाँच्या माजी पंचायत समिती सभापती प्रतिभाताई महल्ले यांनी रिंगणात उडी घेतल्याने चंद्रकांत ठाकरे यांना स्वकीयांशीच लढा द्यावा लागणार आहे.

हेही वाचा: कोरोनामुळे आणखी एकाचा मृत्यू; सात नवे पॉझिटिव्ह

कारंजा तालुक्यातील भामदेवी गटातून भाजपकडून माया करडे, काँग्रेसकडून वैशाली मेश्राम, शिवसेनेकडून ज्योती उगले, राकाॅंकडून माजी उपाध्यक्ष देवेंद्र ताथोड यांच्या पत्नी वर्षा ताथोड, वंचितकडून वैशाली लळे यांनी अर्ज दाखल केले. वाशीम तालुक्यातील उकळीपेन गटातून वंचित बहुजन आघाडीकडून दत्ता गोटे, भाजपकडून चरण गोटे, शिवसेनेकडून शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेश मापारी व राकाँकडून माजी जिल्हाध्यक्ष दिलीप जाधव यांनी अर्ज दाखल केले आहेत. पार्डीटकमोर गटातून काँग्रेसकडून राजूभाऊ चौधरी, भाजपकडून सुनील चौधरी, राकाँकडून विनोद पट्टेबहादूर, अपक्ष सरस्वती चौधरी यांनी नामांकन दाखल केले आहेत. काटा गटातून काँग्रेसकडून संध्या देशमुख, राकाँकडून प्रियंका देशमुख, शिवसेनेकडून ललिता खानझोडे यांनी अर्ज दाखल केले आहेत. कंझरा गटातून भाजपकडून अलकाताई महाकाळ, राकाँकडून सुनिता कोठाळे यांनी अर्ज दाखल केले आहेत. दाभा गटातून काँग्रेसचे दिलीप मोहनावाले, राकाॅंकडून राजेश राठोड, शिवसेनेकडून राजेश जाधव, भाजपकडून संतोष राठोड यांनी नामांकन अर्ज दाखल केले.

मालेगाव तालुक्यातील परिस्थिती
पांगरी नवघरे गटातून विद्यमान सदस्य रत्नमाला उंडाळ राकाँकडून, तर वनिता लहाने भाजप, नर्मदा लहाने काँग्रेस, लक्ष्मी नवघरे शिवसेना, वंचित बहुजन आघाडीकडून लक्ष्मी लहाने यांनी उमेदवारी दाखल केली आहे.

मानोरा तालुक्यातील गटातून
फुलउमरी गटात भाजपकडून सुरेखा चव्हाण, शिवसेनेकडून वनिता राठोड, राष्ट्रवादी काँग्रेसकडून निशा राठोड, अपक्ष म्हणून सारिका पवार यांनी उमेदवारी दाखल केली आहे.

रिसोड तालुक्यात १२ अर्ज
जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या होऊ घातलेल्या पोट निवडणुकीकरिता रिसोड तालुक्यातील ३ जि.प. जागेकरिता १२ उमेदवारांनी, तर पं.स.च्या पाच जागेकरिता २९ उमेदवारांनी आपले अर्ज शेवटच्या दिवशी दाखल केले. अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांमध्ये काही मातब्बर उमेदवारांचा समावेश असून, प्रमुख पक्षांनी आपल्या जुन्याच उमेदवारांवर विश्वास दर्शवला असल्याचे दिसून येते. भर जहागीर गटासाठी विनोद नरवाडे, अमित खडसे, नंदाबाई इप्पर, अनिल गरकळ, विश्वनाथ सानप, कवठा गणाकरिता स्वप्निल सरनाईक, वैभव सरनाईक, मंगलाताई सरनाईक, गोभणी गणाकरिता बेबी ठाकरे, पूजा भुतेकर, रेखा उगले, इंदू वानखेडे यांनी आपले अर्ज दाखल केले आहेत.

आज होणार फैसला
जिल्हा परिषद निवडणुकांबाबत निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असला, तरी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात ही निवडणूक रद्द करण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली आहे. याबाबत आज (ता.६) सर्वोच्च न्यायालय निर्णय देण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांच्या नजरा निकालाकडे लागल्या आहेत.

संपादन - विवेक मेतकर

Nominations have been filed, now look back

loading image